लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची तालुका आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असून विजेच्या समस्येने ग्रस्त आहे. कोरची येथे ३३ केव्ही उपकेंद्रात येणारी वीज ही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून आलेली आहे. या वीज वाहिनीत बिघाड निर्माण झाल्यास कोरची तालुक्यात वीज समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे कोरची येथे सुरळीत वीज पुरवठा करावा, अशी मागणी भ्रष्टाचार निवारण समितीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.आमगाव हे १३२ केव्हीचे मुख्य स्टेशन आहे. आमगाव ते कोरची दरम्यान चिचगड व देवरी हे सबस्टेशन आहेत. जर देवरी व चिचगड उपकेंद्रात कुठलाही बिघाड आला तर त्याचा नाहक त्रास कोरचीवासीयांना सहन करावा लागतो. आमगाव ते कोरचीचे अंतर ९० कि. मी. आहे. त्यामुळे कोरची येथे व्होल्टेजची समस्या सुद्धा नेहमी असते. तसेच प्रशासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून कुरखेडा ते कोरची ३३ केव्हीची वीज जोडणी करण्यात आलेली आहे. परंतु झनकारगोंदी ते डोंगरगाव (फाटा) अंदाजे ८ कि.मी. पर्यंत विजेचे खांब जंगलातून आलेले आहेत. या ८ कि. मी. च्या अंतरामध्ये कुठलेही वाहन जाऊ शकत नाही. घनदाट जंगल असल्यामुळे रानटी जनावरांचा धोका असतो रात्रीच्या वेळी तिथे काम करणे खूपच अवघड व धोकादायक आहे. कोरची येथील विद्युत विभागाला २०१३-१४ मध्ये दुरूस्तीची कामे करण्यासाठी ये-जा करण्याकरिता नवीन गाडी मंजूर झाली असून सुद्धा येथील कर्मचारी एका जुन्या गाडीने कामे करतात. जंगलातून ये-जा करताना कित्येकदा ही गाडी त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोरची ते कुरखेडा मागार्तील विद्युत खांबे सुरळीत करून विद्युत पुरवठा त्वरित सुरु करण्यात येऊन त्वरित चौकशी करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तालुका अध्यक्ष जितेंद्र सहारे, तालुका उपाध्यक्ष आशिष अग्रवाल, सिद्धार्थ राऊत, श्याम यादव, वसीम शेख, चेतन कराडे, बंटी जनबंधू, अभिजित निंबकर, धम्मदीप लाडे, चंदू वालदे, रूपेश नंदेश्वर यांच्यासह समितीत्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
कोरची तालुक्यात सुरळीत वीज पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 1:27 AM
कोरची तालुका आदिवासी बहुल नक्षलग्रस्त असून विजेच्या समस्येने ग्रस्त आहे. कोरची येथे ३३ केव्ही उपकेंद्रात येणारी वीज ही गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथून आलेली आहे. या वीज वाहिनीत बिघाड निर्माण झाल्यास कोरची तालुक्यात वीज समस्येचा सामना करावा लागतो.
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : भ्रष्टाचार निवारण समितीची मागणी; आंदोलन करण्याचा इशारा