विद्युत खांबही उभारले : अतिक्रमित वस्तीत रस्ते, नाल्यांचे काम जोमातगडचिरोली : शहरात गोकुलनगरलगत असलेल्या एकमेव तलावात गेल्या पाच-सहा वर्षांपासून सर्वसामान्यांपासून धनाढ्यांपर्यंत तसेच शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांनीही अतिक्रमण करून पक्क्या घराचे बांधकाम केले आहे. या तलावाच्या पात्रात सद्यस्थितीत शेकडो घरे उभी झाली आहेत. या वस्तीतील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने रस्ते व नाली बांधकाम हाती घेतले आहे. याशिवाय महावितरणने चक्क या अतिक्रमित वस्तीच्या परिसरात वीज खांब उभारून वीज पुरवठा सुरू केला आहे. गोकुलनगरलगत तलावाच्या पात्रातील अवैध घर बांधकामांना पालिका व महावितरण प्रशासनाकडून पाठबळ मिळत आहे. परिणामी अतिक्रमण वाढतच आहे. सदर तलाव सिंचाई विभागाच्या अखत्यारित आहे. महागाईच्या काळात शहरासह जिल्हाभरात जमिनीचे भाव वधारले आहेत. त्यामुळे अनेक नागरिक मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करून पक्क्या घराचे बांधकाम करीत आहेत. गोकुलनगर लगतच्या तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे येथील मासेमारी व सिंचन सुविधेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमणाबाबत अनेकदा तक्रारी व पाठपुरावा करूनही याकडे पालिका, सिंचाई पाटबंधारे विभागासह जिल्हा प्रशासनही प्रचंड दुर्लक्ष करीत आहेत. (प्रतिनिधी)नवे मुख्याधिकारी कारवाई करतील का?गडचिरोली नगर पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून कृष्णा निपाने यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला. शहरात नानाविध समस्या कायम आहेत. गोकुलनगर लगतच्या तलावाच्या पात्रात अतिक्रमधारक खुलेआम पक्के घर बांधत आहेत. तसेच काही लोक येथे प्लॉट पाडून विक्रीचा गोरखधंदाही सुरू केला आहे. परिणामी या तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवे मुख्याधिकारी कृष्णा निपाने या प्रश्नावर कारवाई करतील काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.
अवैध घर बांधकामांना नगर पालिका प्रशासनाचे पाठबळ
By admin | Published: May 15, 2016 1:10 AM