कृष्णार येथे अंत्यविधी : गावात पार्थिव पोहोचताच कुटुंबासह गावकऱ्यांचा कंठ दाटून आला तालुका प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क भामरागड : भूसुरूंग स्फोटात गंभीर जखमी होऊन शहीद झालेल्या सुरेश तेलामी यांची नोकरी लागण्यापूर्वीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. अनेक हालअपेष्टा सहन करीत सुरेश तेलामीने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली. गुरूवारी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात शहीद सुरेश तेलामी याला २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यानंतर सुरेशचे पार्थीव त्याचे स्वगाव असलेल्या कृष्णार येथे आणण्यात आले. गावचा मुलगा शहीद झाल्याने पार्थीव घेऊन येणारे वाहन गावात पोहोचताच पार्थीवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. तिरंग्यामध्ये गुंडाळून ठेवलेले पार्थीव दिसताच सुरेशच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांचाही कंठ दाटून आला. गुरूवारी त्याचे पार्थीव गावापर्यंत पोहोचविण्यासाठी उशीर झाल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजता अंतिम संस्कार करण्यात आले. अंतिम संस्कारासाठी तालुक्यातील सभोवतालच्या गावातील नागरिक उपस्थित होते. सुरेश तेलामी यांच्या पश्चात पत्नी, आई, वडिल, एक लहानसा दोन वर्षाचा मुलगा, तीन बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे. सुरेश तेलामी यांचा जन्म कृष्णार येथेच झाला. दोन वेळच्या जेवनाची भ्रांत असतानाही परिस्थितीवर मात करीत सुरेशने शिक्षण घेतले. सुरेशचे प्राथमिक शिक्षक भगवंतराव प्राथमिक आश्रमशाळा भामरागड येथे झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण भगवंतराव माध्यमिक आश्रमशाळा भामरागड येथेच झाले. शंकरराव बेझलवार उच्च महाविद्यालयात बीए प्रथम वर्षाला असताना गडचिरोली पोलीस दलात पोलीस शिपायाच्या जागा निघाल्या. उच्च शिक्षण घेण्याऐवजी लहान मोठी नोकरी करून कुटुंबाला आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने सुरेश पोलीस भरतीत उतरला. मेहनती असलेला सुरेश पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला व त्याची नेमणूक २०१० साली पोलीस दलात झाली. त्याचा मन मिळावू स्वभाव, इतरांना सहकार्य करण्याची वृत्ती याबाबत गावकरी त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत होते. अशा या लाडक्या भूमिपूत्राला साश्रूनयनांनी गावकऱ्यांनी अखेरचा निरोप दिला. सहाऱ्याच्या काठीलाच द्यावी लागली भडाग्नी म्हातारपणात सहारा देणारा काठी असा उल्लेख सुरेशचे वडील सुरेश बद्दल करीत होते. मात्र या सहाऱ्याच्या काठीलाच भडाग्नी देण्याचे दुर्भाग्य सुरेशच्या वडिलांना लाभले. पोटच्या गोळ्याला भडाग्नी देताना कंठ दाटून येत होता. मात्र अशाही परिस्थितीत स्वत:ला सावरत भडाग्नी दिली. सुरेश यांचा मुलगा अगदी दोन वर्षाचा आहे. मुलाला मोठा अधिकारी बनविण्याचे सुरेशचे स्वप्नही अपुरेच राहिले.
सुरेशने कष्टाचे घाव झेलत मिळवली होती नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2017 1:20 AM