लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : धानोरा तालुक्यातील सर्च(शोधग्राम) येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयात २६ व २७ मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्त्रियांसंबंधीचे विकार, हर्निया, मुतखडा, गलगंड आदी विकारांच्या तब्बल ८० शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोलीसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील रुग्णांवर या शिबिरात उपचार करण्यात आले.ग्रामीण भागातील लोक बरेचदा दुखणे अंगावर काढतात. त्यामुळे सहज बरे होणारे आजार अनेकदा शस्त्रक्रियेपर्यंत येऊन पोहोचतात. सर्चमध्ये आलेल्या रुग्णांवर उपचार करताना ही बाब प्रकर्षाने लक्षात आल्याने, अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्चद्वारे २००५ पासून दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाते. गत चार ते पाच महिन्यात सर्च मध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी शस्त्रक्रियेची गरज असलेल्यांसाठी २६ आणि २७ मार्च दरम्यान महाशिबीर घेण्यात आले. यावेळी तब्बल ८० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या गर्भाशयातील गाठी, गर्भाशयातील रक्तस्त्राव, गर्भाशय बाहेर येणे अशा प्रकारच्या २५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्याचप्रकारे मुतखडा, गलगंड, हर्निया आदी प्रकाराच्याही शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दुभंगलेल्या ओठावरील प्लास्टिक सर्जरीही शिबिरात करण्यात आल्या.जिल्ह्यात शस्त्रक्रियेचे प्रमाण वाढत आहे. मात्र अनेकदा केलेली नसबंदी उघडण्याचीही गरज निर्माण होते. ही गरज लक्षात घेऊन केलेली नसबंदी उघडण्याच्या चार शस्त्रक्रिया यावेळी करण्यात आल्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, लोणंद, भुसावळ, अकोला येथील २४ डॉक्टरांच्या चमूने सदर शस्त्रक्रिया केल्या. यवतमाळ, नागपूर, कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थीही शिबिरात मदतीसाठी सहभागी झाले होते. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना नीट हालचाल करता यावी यासाठी त्यांना काही व्यायाम शिकविणे गरजेचे असते. ही गरज लक्षात घेऊन पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयाच्या फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी शिबारानंतर काही दिवस रुग्णांना सेवा दिली. सर्चच्या संस्थापक डॉ. राणी बंग आणि डॉ. रवींद्र वोरा यांच्या नेतृत्वात सदर शिबीर घेण्यात आले. सर्चच्या वैद्यकीय चमूतील डॉ. चैतन्य मलिक, डॉ. वैभव तातावार, डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. शिल्पा मलिक, डॉ. मृणाल कालकोंडे, डॉ. दत्ता भलावी, डॉ. आरती बंग, डॉ. मयुरी भलावी, डॉ. प्रियंका काळे यांनी शिबिराची व्यवस्था सांभाळली.गर्भाशयातील विकारांवर शस्त्रक्रियाजिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात अनेक महिलांना प्रसुतीनंतर योग्य आराम व आहार मिळत नाही. तसेच सातत्याने गर्भधारणा आणि होणारे गर्भपात यामुळे महिलांचे गर्भाशय बाहेर येण्याचा प्रकार घडताना दिसतो. पण महिलांना याबाबत माहितीच नसल्याने अनेक महिला हा त्रास सहन करीत असतात. असे गर्भाशय बाहेर आलेल्या २० महिलांवर लोणंद येथील डॉ. संजय शिवदे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. १५ वर्षांपासून ते सातत्याने सर्च मध्ये शस्त्रक्रिया शिबिरात सेवा देत आहेत.
चातगावातील शोधग्राममध्ये ८० रुग्णांवर शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 12:17 AM
धानोरा तालुक्यातील सर्च(शोधग्राम) येथील मॉ दंतेश्वरी रुग्णालयात २६ व २७ मार्च दरम्यान शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिरात स्त्रियांसंबंधीचे विकार, हर्निया, मुतखडा, गलगंड आदी विकारांच्या तब्बल ८० शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
ठळक मुद्दे२४ वैद्यकीय तज्ज्ञांची उपस्थिती : विदर्भातील रूग्णांची शिबिरात हजेरी; रूग्णांना दिले व्यायामाचे धडे