गडचिराेली : सहायक संचालक आरोग्यसेवा (कुष्ठरोग) गडचिरोली व प्लास्टीक सर्जन विभाग वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने, सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे ११ कुष्ठरुग्णांना आलेल्या विकृतीवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन देण्यात आले. (surgery on leprosy patients)
‘आझादी का अमृत महोत्सव’चे औचित्य साधून सदर शिबिर जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या मार्गदर्शनात पार पडले. कुष्ठराेग झालेल्या काही रुग्णांच्या हातपायांचे स्नायू आखडतात. त्यांना दैनंदिन जीवन जगणे कठीण होते. या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपूर, अमरावती येथेच शत्रक्रिया करण्याची सोय आहे, परंतु गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांना गडचिरोली येथेच शस्त्रक्रिया करून घेण्याचे काम पहिल्यांदाच झाले आहे.
शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील प्लास्टीक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ.एस.बी.पाटील यांनी कुष्ठरुग्णांची तपासणी केली. तपासणीअंती ११ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. डॉ.एस.बी. पाटील व डॉ.अली त्यांच्या चमूने रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या.
पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेसाठी सर्वतोपरी सहकार्य करू. यानंतरही प्रक्रिया अशीच पुढे चालेल, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रुडे यांनी केले, तसेच भविष्यात कुष्ठरोग व येणारी विकृती आटोक्यात आणण्यासाठी संशोधनावर अधारित कृती कार्यक्रम करण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे यांनी केले.