गडचिरोली : आदिवासींच्या प्रचंड विरोधानंतर सुरु झालेला सूरजागड लोहप्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तेथील काही माफिया व कंत्राटदार आदिवासी महिलांना नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार करतात, असा आरोप असलेल्या कथित नक्षलपत्राने खळबळ उडाली आहे. दरम्यान,आदिवासी महिलाओं को छेडना बंद करो, नही तो मौत का शिक्षा निभायेंगे... अशी धमकीही या पत्राद्वारे दिली आहे. या पत्राची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.
स्पेशल दंडकारण्य झोनल कमिटी दक्षिण गडचिरोली प्रवक्ता कार्तिककुमारच्या नावाने लाल अक्षरात असलेले हे पत्र १७ एप्रिलच्या रात्री एटापल्ली- आलापल्ली मार्गावर एटापल्लीपासून एक किमी अंतरावर झाड तोडून रस्त्यावर टाकलेले होते. तेथे हे पत्र आढळले आहे. त्यात सूरजागड लोहखनीज प्रकल्पात नोकरीचे आमिष दाखवून आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण सुरु असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
माफिया व कंत्राटदार या दोघांचा पत्रात उल्लेख आहे. काही आदिवासी तरुणांकडून या दोघांनी नोकरीसाठी पैसे घेतल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. हे पैसे तात्काळ परत करावेत. विशेष म्हणजे, याविरुध्द कोणी आवाज उठवला तर पोलिसांचा धाक दाखविला जातो, असा गंभीर आरोपही केला आहे. महिलांची छेडछाड न थांबविल्यासस दोघांना ठार मार, अशी धमकीही दिली आहे. दरम्यान, कथित पत्र पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे पत्र कार्तककुमारने लिहिले की नक्षली चळवळीच्या नावे भलत्याच कोणी लिहिले, याची पोलिसांकडून खातरजमा करणे सुरु आहे.
नक्षल्यांनी यापूर्वी झाड तोडून कधी पत्र लिहून टाकलेले नाही. हे पत्र कोणी लिहिले, तेथे कोणी टाकले याची चौकशी सुरु आहे. महिलांवर अशा प्रकारे अन्याय- अत्याचार होत असल्याची तक्रार अद्याप प्राप्त नाही. पत्रात उल्लेख असलेल्या दोघांपैकी एकाला कंपनीने आठ महिन्यांपूर्वी काढून टाकल्याची माहिती आहे. योग्य ती चौकशी सुरु आहे.
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली