एटापल्ली तालुक्यातील मगुंठा येथे दि. २६ फेब्रुवारी रोजी अशोक रामू कोरसामी या आदिवासी युवकाची भर कार्यक्रमातून नेऊन नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. त्यावेळी ते नक्षलवादी कंपनीसाठी (लोहखाण) काम करत असल्याबद्दल त्याला बोलत होते. सुरजागड प्रकल्प नव्याने सुरू होत असल्याचे सांगत लॉयड मेटल्स व त्रिवेणी मायनिंग कंपनीने या कामासाठी माणसे मिळवून देण्यास आपल्या पतीला सांगितले होते. त्यामुळे तो चार महिन्यांपासून गावागावात जाऊन युवकांची कागदपत्रे गोळा करून देत होता. याला नक्षलवाद्यांचा विरोध असल्याने त्याचा राग मनात ठेवून नक्षलवाद्यांनी त्याला मारल्याचे मृतक अशोकची पत्नी बेबी हिने वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
(बॉक्स)
पोलीस सुरक्षेच्या भाड्याचे कोट्यवधी थकीत?
दोन वर्षांपूर्वी सदर लोहखाणीतून कच्चा माल काढताना आणि तो लॉयड मेटल्सच्या घुग्गुस येथील कारखान्यात नेताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागविला जात होता. त्याच्या भाड्यापोटी पोलीस विभागाची ४० कोटींपेक्षा जास्त रक्कम कंपनीकडे थकीत आहे. ते पैसे अजूनही कंपनीने भरलेले नसताना आता पुन्हा विनामोबदला सदर कंपनीला पोलीस संरक्षण मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोनसरीचा प्रकल्प अधांतरीच
सुरजागडच्या लोहखाणीला जिल्ह्यात लोहप्रकल्प उभारणीच्या अटीवरच लीज मंजूर केली होती. त्यासाठी कोनसरी येथे साडेतीन वर्षापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रस्तावित प्रकल्पाचे भूमिपूजनही झाले. पण नंतर लोहदगडांची वाहतूक सुरूच राहूनही प्रकल्पाच्या उभारणीत कोणतीही प्रगती झाली नाही. यावरून हा प्रकल्प खरोखरच गडचिरोली जिल्ह्यात होणार की नाही, यावरही आता प्रश्नचिन्ह लागले आहे.