गडचिरोली - गेल्या दिड दशकापेक्षा जास्त कालावधीपासून नक्षल चळवळीत विविध जबाबदा-या सांभाळणा-या आणि डिव्हीजनल कमिटीचे सदस्य असलेल्या तरुण नक्षली दाम्पत्याने गुरूवारी (दि.२५) गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यापुढे आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर प्रत्येकी ९ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले होते.
दीपक उर्फ मंगरू सुकलू बोगामी (३०) आणि मोती उर्फ राधा झुरू मज्जी (२८) अशी या आत्मसमर्पित दाम्पत्याची नावे आहेत. यासंदर्भात पो.अधीक्षक बलकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हा मूळचा छत्तीसगडमधील बस्तर जिल्ह्याचा रहिवासी आहे. २००१ मध्ये वयाच्या बाराव्या वर्षी तो नक्षल चळवळीत जागरगुंडा दलममध्ये दलम सदस्य म्हणून भरती झाला. २०१२ पासून आतापर्यंत माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक ५ मध्ये डिव्हीजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर १२ खून, ३ भूसुरुंग स्फोट आणि १७ चकमकीचे गुन्हे दाखल आहेत.
मोती उर्फ राधा ही भामरागड तालुक्यातील भटपारची मूळची रहिवासी आहे. २००४ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी ती भामरागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. डिसेंबर २०१७ पासून उत्तर बस्तर कंपनी क्रमांक १० मध्ये डिव्हीजनल कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होती. तिच्यावर २ खून आणि १५ चकमकीचे गुन्हे दाखल आहेत.
बक्षिसाच्या रकमेसह पुनर्वसनाचा लाभ
सदर नक्षली दाम्पत्यांवर असलेल्या एकूण १८ लाख ५० हजारांच्या बक्षीसाची रक्कम त्यांच्याच भविष्यातील नियोजनासाठी त्यांना दिली जाणार आहे. याशिवाय त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आत्मसमर्पण योजनेनुसार मिळणारे विविध लाभ आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
पोलिसांची आक्रमकता आणि आरोग्याच्या समस्येमुळे आत्मसमर्पण
पत्रकारांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना आत्मसमर्पित दाम्पत्याने पोलिसांच्या आक्रमकतेमुळे नक्षल चळवळीवर दबाव वाढला असल्याची कबुली दिली. दिवसेंदिवस जंगलात फिरणे कठीण होत आहे. त्यात आपल्याला किडनीचा आजारही असल्यामुळे नक्षल चळवळ सोडण्याचा निर्णय घेतल्याचे दीपकने सांगितले. २०१५ मध्ये दोघेही नक्षल्यांच्या बटालियन क्र.२ मध्ये असताना या दोघांचे लग्न झाले होते. पण मोजकेच दिवस एकत्र राहायला मिळाले. आता चळवळीतून बाहेर आल्याने शांततेचे जीवन जगायला मिळेल, असे ते म्हणाले.