गुरूवारी सकाळी ८ वाजता प्रारंभ : दोन राज्यांच्या अधिकाऱ्यांची सिरोंचात झाली बैठकसिरोंचा : मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्प निर्माणासाठी मंगळवारी तेलंगण व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुंबई येथे सामंजस्य करार झाल्यानंतर संयुक्त सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तेलंगण व महाराष्ट्राच्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सिरोंचा येथे भेट देऊन सर्वेक्षणाच्या कार्यपद्धतीची रूपरेषा ठरविली. त्यानुसार गोदावरी पूल स्थळापासून १४ किमी अंतरावरील तुमनूर पर्यंतचा नदी किनारा निश्चित करण्यात आला. हे संयुक्त सर्वेक्षण १० मार्च गुरूवारपासून सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.प्रभारी तहसीलदार सत्यनारायण कडार्लावार यांच्या दालनात सिरोंचा येथे सदर बैठक पार पडली. यावेळी तेलंगण सिंचाई विभागाचे उपविभागीय अभियंता बी. भद्रय्या, उपअभियंता डी. विश्वेश्वरराव, गडचिरोली सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता जनार्धन पौनिकर, के. एम. खेकबंटीवार, बी. पी. मुनघाटे उपस्थित होते. सर्वेक्षणादरम्यान उद्भवणाऱ्या अप्रिय घटनांचा सामना करण्याच्या मुद्यावरही चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न दंडाधिकाऱ्यांच्या अखत्यारितील असून संरक्षणाची जबाबदारी पोलीस विभागाची असल्याचे कडार्लावार यांनी सांगितले. तहसीलदारांसोबत बैठकीनंतर उभय राज्यांच्या अधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची भेट घेतली. या प्रकल्पात सिरोंचा तालुकावासीयांचे कमीतकमी नुकसान होण्याच्या दृष्टीने तेलंगण शासन प्रयत्नशील असल्याचे भद्रय्या यांनी सांगितले.समुद्रसपाटीपासून १०० मीटर उंच घेतल्यास गोदावरीच्या दोन्ही किनाऱ्यापर्यंत पाण्याची व्याप्ती राहील. अशा परिस्थितीत फक्त शिवारातील नाल्यात पाणी येईल. तथापी नुकसान होणार नाही. शिवाय सिरोंचा तालुक्यातील ५० हजार एकर कृषी क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल आणि विशेष बाब ही की, त्यासाठी महाराष्ट्र शासनाला काहीही खर्च येणार नाही, असेही बी. भद्रय्या यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)
मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पासाठी पुन्हा सर्वेक्षण
By admin | Published: March 10, 2016 1:52 AM