उपोषणाचा इशारा : ग्रा.पं. सदस्यास मारहाण घोट : १७ एप्रिल रोजी घोट ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रमांक ५ मधील निकतवाडा येथे मतदान सुरू होते. दरम्यान, बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले अहेरीचे पोलीस उपनिरीक्षक किरण दीडवाघ यांनी ग्रा.पं. सदस्य पुरूषोत्तम अर्कपटलवार यांना मारहाण केली, असा आरोप करीत त्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी पुरूषोत्तम अर्कपटलवार यांच्यासह वार्डातील नागरिकांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.यावेळी माहिती देताना पुरूषोत्तम अर्कपटलवार म्हणाले, वार्ड क्रमांक ५ मधून ग्रा.पं. निवडणुकीतील उमेदवार म्हणून आपण उभा होतो. मला कोणतीही सूचना न देता पीएसआय किरण दीडवाघ यांनी मला अमानुष मारहाण केली, असा आरोप अर्कपटलवार यांनी यावेळी केला. किरण दीडवाघ यांनी मला बेदम मारहाण केल्याने मी बेशुध्द पडलो. आपली कोणतीही चूक नसताना विनाकारण नागरिकांसमोर आपल्याला पीएसआय दीडवाघ यांनी मारहाण केली. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पीएसआय किरण दीडवाघ यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अन्यथा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आपण उपोषण करणार, असा इशारा ग्रा.पं. सदस्य पुरूषोत्तम अर्कपटलवार, मुरलीधर देवतळे, दिलीप खोब्रागडे, सुरेश येरेवार, रोहिदास वाकडे, खुशाल माधावार, उष्टूराम वाकडे, किशोर देवतळे, अक्षय डोंगरे यांनी दिला.ग्रा.पं. निवडणुकीदरम्यान काही जण कायदा व सुव्यवस्थेचा भंग करीत असल्याचे लक्षात आल्यावर आपण त्यांना समजाविले व शांततेत निवडणूक पार पाडली. मारहाणीचा प्रश्न उद्भवत नाही. - किरण दीडवाघ, पीएसआय अहेरी