बालक मृत्यू प्रकरण : मुस्लीम वेल्फेअर सोसायटीची मागणी गडचिरोली : स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयाचे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. प्रविण किलनाके यांनी केवळ पैशाच्या हव्याशापोटी तसेच हेतुपुरस्सर गर्भवती महिलेच्या उपचाराकडे दुर्लक्ष केले. परिणामी वेळेत सिजर प्रसूती न केल्याने शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख हिच्या बालकाचा गर्भाशयातच मृत्यू झाला. त्यामुळे डॉ. किलनाके यांना सेवेतून निलंबित करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मुस्लीम वेल्फेअर सोसायटी गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली. यावेळी पत्रकार परिषदेला मुस्लीम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष महमद मुस्तफा शेख, सचिव अकील अहमद शेख, कोषाध्यक्ष ए. आर. पठाण, सहसचिव हबीब खॉन पठाण, सोसायटीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आयशा अली, शहर अध्यक्ष यास्मीन शेख, फरजाना शेख, धानोरा येथील जमीर कुरेशी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना सोसायटीचे अध्यक्ष महमद मुस्तफा शेख व सचिव अकील शेख यांनी सांगितले की, अहेरी येथील गर्भवती महिला शमीम सुलतान अब्दुल शगीर शेख हिला २२ डिसेंबर रोजी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयातून गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. या महिलेचे पती अब्दुल शेख यांनी तेथील प्रसुतीतज्ज्ञ डॉ. किलनाके यांना रात्री १० वाजता प्रसुती वार्डात भेटून सिजर करण्याची विनंती केली. मात्र डॉ. किलनाके यांनी २५ डिसेंबरपर्यंत सदर गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष केले. डॉ. किलनाके यांनी रक्ताची गरज असल्याचे सांगितल्यावर सदर महिलेच्या पतीने स्वत: रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले. मात्र डॉ. किलनाके यांनी सदर गर्भवती महिलेला रक्त पुरविले नाही. प्रसुती वेदनेने किंचाळत असलेल्या शमीम शेख हिची सिजर प्रसुती डॉ. किलनाके यांनी केली नाही. ‘माझ्या खासगी दवाखान्यात तिला भरती करून १० हजार रूपये जमा करा, तिथे आताच सिजर करून देतो, नाही तर बाळ दगावल्यास मी जबाबदार राहणार नाही, असे डॉ. किलनाके हे महिलेचे पती शेख यांना म्हणाल्याचे महमद शेख व अकील शेख यांनी पत्रकार परिषदेत सागितले. डॉक्टरवर कारवाई झाल्यावरच डिस्चार्ज डॉ. प्रविण किलनाके यांच्या दुर्लक्षितपणामुळे व हेकेखोर धोरणामुळे शमीम शेख हिच्या बालकाचा गर्भाशयातच मृत्यू झाला. किलनाके यांनी पैशाच्या हव्याशापोटी एका जीवंत शिशूची भृणहत्या करून प्राण घेतले आहे, असे सांगत डॉ. किलनाके यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय शमीम शेख हिला सामान्य रूग्णालयातून डिस्चार्ज केले जाणार नाही, असा इशारा महमद शेख व अकील शेख यांनी यावेळी दिला. डॉ. किलनाके यांच्या खासगी रूग्णालयाची चौकशी करावी, त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, पीडित महिलेला नुकसान भरपाई देण्यात यावी, चौकशी समितीत एनजीओ अथवा सामाजिक क्षेत्रातील एका व्यक्तीचा समावेश करावा आदी मागण्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.
किलनाकेला निलंबित करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2017 12:50 AM