धानोरा (गडचिरोली) : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या मुरूमगाव येथील खरेदी केंद्रावरील ९८७८.९५ क्विंटल धानाचा घोटाळा झाल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचे धानारो येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज सुंदरलाल चौधरी तसेच प्रतवारीकर तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल नानाजी कोकोडे यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे या घोटाळ्यात कोण-कोण सहभागी आहे, याचा पर्दाफाश होण्याच्या दृष्टीने एक पाऊल समोर टाकण्यात आल्याचे दिसून येते.
धान खरेदी योजना हंगाम २०२१-२२ मध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या धानापैकी ९८७८.९५ क्विंटल धान खरेदी पुस्तकात दाखविलेला असला तरी तो धान प्रत्यक्षात केंद्रावर नाही. त्यामुळे त्या धानाचा घोळ केल्याचा ठपका वरील दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवत महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिंगला यांनी २२ ऑगस्टला आदेश काढून दोघांवर निलंबनाची कारवाई केली.
केवळ कागदोपत्रीच दाखविली खरेदी?
उपप्रादेशिक कार्यालय, धानोराअंतर्गत अविका संस्थेच्या मुरूमगाव खरेदी केंद्रावर आधारभूत खरेदी योजनेनुसार गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात २७ हजार ६५८.७० क्विंटल आणि रबी हंगामात ६०१०.८० क्विंटल अशी एकूण ३३ हजार ६६९.५० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. त्यानुसार धान भरडाईसाठी डिलिव्हरी आदेश प्रादेशिक कार्यालय, गडचिरोली यांच्याकडून देण्यात आले होते. दरम्यान, प्रादेशिक व्यवस्थापक गडचिरोली यांनी खरेदी केंद्र मुरूमगाव येथे तपासणीकरिता भेट दिली असता खरीप व रब्बी हंगामातील मिळून ९८७८.९५ क्विंटल धानाचा साठाच शिल्लक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे धान प्रत्यक्ष खरेदी केले की केवळ कागदोपत्रीच खरेदी दाखवून शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावण्याचा डाव होता? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
३ कोटी रुपयांचा अपहार
- या प्रकरणी प्रादेशिक व्यवस्थापकांनी संस्थेचे सचिव एल. जी. धारणे, उपप्रादेशिक व्यवस्थापक धीरज चौधरी आणि प्रतवारीकार तथा प्रभारी विपणन निरीक्षक राहुल नानाजी कोकोडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली; परंतु त्यांनी केलेला खुलासा समाधानकारक नव्हता.
- गायब असलेल्या धानाची किंमत १ कोटी ९१ लाख ६५ हजार १६३ रुपये तसेच संस्थेकडून दीडपटीने वसूलपात्र असलेली रक्कम २ कोटी ८७ लाख ४७ हजार आणि बारदानाची किंमत १५ लाख ८ हजार ५५३ अशा एकूण ३ कोटी २ लाख ५६ हजार इतक्या रकमेचा अपहार करून महामंडळाचे व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
- चौधरी यांच्याकडील उपप्रादेशिक व्यवस्थापक धानोरा या पदाचा अतिरिक्त पदभार हिंमतराव सोनवणे, उपप्रादेशिक कार्यालय, आरमोरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.