बिबट्याच्या कातड्याचे प्रकरण : एका गटात १५ ते २० सदस्यांचा सहभागएटापल्ली : वाघ, बिबट यांच्या कातड्याची पूजा करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी विधी करीत असताना दोन शिक्षकांसह चार आरोपींना अटक करण्यात आली. एटापल्ली तालुक्यात अशाच स्वरूपाचे काम करणाऱ्या तीन ते चार टोळ्या सक्रिय असल्याची माहिती पुढे येत आहे. गुप्त धनाच्या लालसेने वाघाचे कातडे, काळी मांजर, खवले मांजर, दोन तोंडी साप, वयस्कर कासव, राम, लक्ष्मण सीता यांच्या संयुक्त मुद्रेतील नाणे, पांढरा पळस वनस्पती आदी प्रकारचे साहित्य शोधून अघोरी विद्येच्या साहाय्याने पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रयोग येथे केला जातो. अशा कामासाठी या टोळ्या अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने आपले रॅकेट चालवीत असून प्रत्येक टोळीत दोन ते तीन म्होरक्यासह १५ ते २० सदस्य सहभागी असतात. ते गटागटाने आपल्या कार्याची जबाबदारी पार पाडतात. काही गट वाघाची कातडी, खवले मांजर, काळी मांजर, वयस्क अस्वल आदींचा शोध घेतात. तर काही गट तांत्रिक व मांत्रिकाचा शोध घेणे, मिळालेले साहित्य सुरक्षित ठेवणे, पूजाविधीस योग्य जागेची निवड करणे, पोलीस व वन विभागावर पाळत ठेवणे, अशा जबाबदाऱ्या स्वीकारून गेली कित्येक वर्ष एटापल्लीसह परिसरातील भागांमध्ये आपला गोरखधंदा वाढवीत आहे. अंधश्रध्देमुळे अनेक लोक या टोळ्यांच्या कामांना बळी पडत असून अशाच प्रकारातून घोटसूर येथे वन विभागाला चार आरोपी पकडण्यात यश आले. यामध्ये दोन शिक्षकांचाही समावेश आहे. एटापल्ली तालुक्यात या अगोदर वाघाचे कातडे, अवयव तस्करीच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्येही शिक्षकांचा सहभाग असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)
तीन ते चार टोळ्या सक्रिय असल्याचा संशय
By admin | Published: January 03, 2016 2:00 AM