दिलीप दहेलकर गडचिरोलीग्रामीण भागातील कुटुंबीयांचे राहणीमान उंचविण्यासोबत आरोग्य चांगले राहण्यासाठी गावे हागणदारीमुक्त करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्याची चळवळ सुरू केली आहे. वैयक्तिक शौचालय बांधकामामध्ये चामोर्शी तालुक्याने उद्दिष्टापेक्षा अधिक शौचालयाचे काम पूर्ण करून अव्वल स्थान पटकाविले आहे. यावरून हागणदारीमुक्तीकडे चामोर्शी तालुक्याची वेगवान वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.यावर्षी सन २०१५-१६ मध्ये गडचिरोली जिल्ह्याला एकूण १३ हजार ५५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली तेवढेच शौचालय मंजूर करून सदर वैयक्तिक शौचालय बांधकामाची चळवळ राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालयासाठी प्रति लाभार्थी १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. यात केंद्र व राज्य सरकारच्या हिस्याचा समावेश आहे. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्याला यंदा ५८६ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्ट पूर्ण करीत चामोर्शी तालुक्याने अधिकचे शौचालय बांधकाम केले आहे. ९२७ शौचालयाचे बांधकाम चामोर्शी तालुक्यात पूर्ण झाले असून याची टक्केवारी १०४.६३ आहे. चामोर्शी तालुक्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आरमोरी तालुका असून या तालुक्यात १ हजार २४३ मंजूर शौचालयांपैकी २९० शौचालय ३१ आॅगस्टपर्यंत पूर्ण करण्यात आली असून याची टक्केवारी २३.३३ आहे. जिल्ह्यात एकूण १३ हजार ५५ मंजूर शौचालयांपैकी २ हजार ९७६ शौचालय पूर्ण झाले आहेत. अद्यापही तब्बल १० हजार ११६ शौचालय अपूर्ण स्थितीत आहेत. चामोर्शी वगळता इतर ११ तालुक्यात वैयक्तिक शौचालय बांधणीत लाभार्थ्यांकडून प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. भामरागड तालुका वैयक्तिक शौचालयात प्रचंड माघारला आहे.
स्वच्छ भारत अभियान : वैयक्तिक शौचालय बांधणीत चामोर्शी अव्वल
By admin | Published: October 17, 2015 1:56 AM