गडचिराेली : जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांचे वेतन मागील महिनाभरापासून रखडले आहे. त्यांना वेतन देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस तथा महादलित परिसंघाचे जिल्हाध्यक्ष छगन महाताे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात लिपिकांची अनेक पदे रिक्त आहेत. एका लिपिकाकडे दाेन ते तीन टेेबलचा काम साेपविण्यात आला आहे. त्यामुळे वेळेवर प्रशासकीय कामे हाेत नाही. सफाई कामगारांची पगार बिले बनविण्यास विलंब हाेत असल्याने वेतन मिळण्यास विलंब हाेत आहे. सफाई कामगारांना अतिशय कमी वेतन मिळते. त्यातच तेही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागताे. वेतन नियमित द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच पागेलाड समितीचे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावे. सफाई कामगारांना रात्रपाळी देतेवेळी हाेत असलेला अन्याय दूर करावा. सातव्या वेतन आयाेगानुसार आवाशित प्रगती याेजना लागू करावी, सेवा पुस्तकाची दुय्यम प्रत द्यावी, स्थायी आदेश द्यावे, डेप्युटेशन रद्द करून जुन्या जागेवर नेमणूक करावी, रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने भरती करायची असल्यास आराेग्य सेवेतील कामगारांच्या मुलांना संधी द्यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.