गडचिराेली : तालुक्यातील राजगाटा-कळमटाेला परिसरात पाच लाेकांचा बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडाेबा व अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथून प्रत्येकी एकेक टीम पाेर्ला आणि चातगाव वनपरिक्षेत्रात दाखल झाली आहे. हल्लेखाेर वाघिणीला पकडण्यासाठी चमू कसाेशीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळे सीटी-१ नंतर टी-६ ही वाघीण लवकरच वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गडचिराेली वनवृत्ताच्या वडसा वनविभागातील पाेर्ला व गडचिराेली वनविभागातील चातगाव वनपरिक्षेत्रात समाविष्ट गावांमध्ये गेल्या दाेन वर्षांपासून वाघांचा वावर आहे. चातगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजगाटा चेेक येथील गाेविंदा गावतुरे यांचा वाघाने ६ नाेव्हेंबर २०२० राेजी बळी घेतला तेव्हापासून १० ते १२ किमीच्या ह्या परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली. आतापर्यंत याच परिसरातील १३ लाेकांचा बळी वाघांनी घेतला. त्यामुळे दिभना जंगल परिसरात वावर असलेल्या वाघाचा बंदाेबस्त करण्याची मागणी स्थानिक व पीडितांकडून वनविभागाकडे केली जात हाेती.
२६ जुलै ते २४ ऑक्टाेबर २०२२ या कालावधीत दिभना, धुंडेशिवणी, चुरचुरा व कळमटाेला येथे वाघाने ठार केलेल्या घटनास्थळावरील ट्रॅप कॅमेऱ्यांवर पाच घटना घडवून आणणारी मादी वाघ टी-६ असल्याचे स्पष्ट झाले. हे हल्लेखाेर वाघिणीचा बंदाेबस्त करण्याची मागणी सातत्याने केली जात असताना त्या मागणीची दखल घेत हल्लेखाेर वाघाला जेरबंद करण्यासाठी गडचिराेली वनवृत्ताने मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्याकडे परवानगी मागितली. त्यानुसार १० ऑक्टाेबरला वाघाला जेरबंद करण्याची परवानगी मिळाली. त्यातही ३० नाेव्हेंबर २०२२ पर्यंत वाघाला जेरबंद करण्याचे आदेश आहेत.
विशेष म्हणजे, वडसा वन विभागात टी-६, तर गडचिराेली वन विभागात जी-५ म्हणून या हल्लेखाेर वाघिणीची नाेंद व ओळख आहे. या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडाेबा येथील डाॅ. रविकांत खाेब्रागडे यांची चमू तीन दिवसांपूर्वी, तर अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट येथील दुसरी चमू एक दिवसापूर्वी उपक्षेत्र मरेगाव व अमिर्झा येथे दाखल झाली. ही चमू वाघिणीवर लक्ष ठेवून असून, लवकरच तिला जेरबंद केले जाईल, असे गडचिराेली वनवृत्ताचे वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर यांनी सांगितले.
हल्लेखाेर वाघिणीने कुणा-कुणाचा घेतला बळी?
गडचिराेली तालुक्याच्या दिभना, जेप्रा, राजगाटा, कळमटाेला, धुंडेशिवणी व चुरचुरा भागात वावर असलेल्या हल्लेखाेर टी-६ वाघिणीने आतापर्यंत पाच लाेकांचा बळी घेतला. यामध्ये दिभना येथील नीलकंठ गाेविंदा माेहुर्ले, धुंडेशिवणी येथील खुशाल तुकाराम निकुरे, चुरचुरा येथील पार्वतीबाई नारायण चाैधरी, कळमटाेला येथील कृष्णा महागू ढाेणे व प्रभाकर तुकाराम निकुरे, आदींचा समावेश आहे. यातील तीन घटना चातगाव वनपरिक्षेत्र, तर दाेन घटनांपैकी एक पाेर्ला वनपरिक्षेत्र, तर दुसरी पाेर्ला एफडीसीएम अंतर्गत घडली. याशिवाय १६ पशुधनाचाही बळी या वाघिणीने घेतला.
दाेन वर्षांत तालुक्यात २३ बळी
गावे - व्याघ्रबळी
- राजागाटा चेक व माल - ३
- गाेगाव - २
- धुंडेशिवणी - ३
- महादवाडी - १
- कुऱ्हाडी - १
- भिकारमाैशी - १
- कळमटाेला - २
- दिभना - २
- जेप्रा - २
- इंदिरानगर - १
- चुरचुरा माल - ३
- पाेर्ला - १
- बाेदली - १