आरमोरी : शहराच्या ताडुरवार नगर वार्ड क्रमांक १ मध्ये सांडपाणी, नाली, अस्वच्छता, पथदिवे, नळ पाणी पुरवठा आदीसह विविध समस्या निर्माण झाले आहेत. मूलभूत साेयीसुविधाचा अभाव असून याकडे स्थानिक न.पं. प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
या समस्या मार्गी लावण्यासाठी सदर वार्डातील नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला निवेदन दिले.यावेळी म्हटले आहे की, या वार्डात डाॅ.रामकृष्ण मडावी ते डॉ.चिखराम यांच्या घरापर्यंतचा परिसर विविध समस्यांनी ग्रस्त असून या भागात सांडपाणी रस्त्यावरून वाहते. नाल्याच्या उपसा होत नाही. कचरा गाडी येत नाही. पक्के रस्ते नाही. सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची सुविधा व नळ जोडणी नाही. या विविध समस्या कायम असून याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर समस्या तत्काळ निकाली काढाव्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वार्डातील नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला केला आहे. मदन काळबांधे ते पंकज आखाडे यांच्या घराजवळ सांडपाण्याचे मोठे डबके तयार झाले असून मोकाट डुकर व जनावरे दिवसभर डबक्यात बसून राहतात. सदर साचलेल्या पाण्याची मोठी दुर्गंधी येत असून त्याचा त्रास घराजवळील नागरिकांना सहन करावा लागतो. साचलेल्या पाण्यात मच्छराची पैदास वाढून नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सांडपाण्याचा योग्य निचरा होत नाही. नाल्याचा उपसाही नियमित केला जात नाही.
सदर वस्तीत दलित आणि आदिवासी समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. या वस्तीत सिमेंटची पक्के रस्ते बनविण्यात आले नाही. मात्र ज्या वस्तीत एक दोन घरे आहेत, त्या वस्तीत सिमेंट रोड झालेले आहेत.
आदी विविध प्रकारच्या समस्या मोठ्या प्रमाणात असून त्या लवकर निकाली काढाव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वार्डातील नागरिक प्रेमलाल मेश्राम, प्रशांत कावळे, श्रीधर कुथे, सुधाकर निकेसर, अनिल श्रीकोंडावार व इतर अनेक नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला दिला आहे.
बाॅक्स
पथदिवे व पाणी समस्या ऐरणीवर
हेतुपुरस्सर या वस्तीकडे मूलभूत सुविधा पुरविण्याकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. या भागात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे नळाचे कनेक्शन देण्यात यावे सन २०२० मध्ये आरमोरी नगर परिषद अंतर्गत अनेक ठिकाणी नविन विजेचे खांब लावण्यात आले. मात्र चंद्रकांत बारसागडे यांच्या घराजवळ रस्त्यावर रात्री अंधार राहत असूनही नवीन विद्युत खांब लावण्यात आले नाही.