लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर असलेल्या एका खेड्यातून रुग्ण महिलेला खांद्यावर उचलून ६० कि.मी. चे अंतर पायी कापून लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील खेडोपाडी रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे हे वास्तव कित्येक वर्षांपासून असून, त्याकडे प्रशासनाने आजवर डोळेझाक केली आहे.छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातल्या लहानशा खेड्यात राहणाऱ्या या महिलेला ताप आणि सर्दी व खोकल्याने ग्रासले होते. तिला नागरिकांनी एका बाजेवर टाकून तब्बल ६० कि.मी. चे अंतर कापून लाहेरीच्या दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून तिला रुग्णवाहिकेतून भामरागडच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले.अशा प्रकारच्या घटना येथे नेहमीच घडताना दिसतात. चार दिवसांपूर्वीच एटापल्ली येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही. परिणामी तिच्या कुटुंबियांनी स्वत:च्या बैलबंडीत मृतदेह टाकून रूग्णालयापर्यंत आणला. पूर्वी तुमरगुंडा येथील एका इसमाला मुलाचे प्रेत खांद्यावर घरी न्यावे लागले होते.