गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री सुरूच
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
शहरातील अनेक वाॅर्डांत सट्टापट्टी जोमात
देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसूली करीत आहेत. मात्र याकडे देसाईगंज पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरुवात होते.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होता. मात्र वीज बिल भरले नसल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीज पुरवठा आवश्यक झाला आहे.
विटा बनविण्याच्या कामास सुरुवात
देसाईगंज : हिवाळ्याला सुरुवात झाली असल्याने घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात विटांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात विटा बनविण्यासाठी पाेषक वातावरण असल्याने विटा बनविण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.
गोरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कतलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गोरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जि.प. समोरील अतिक्रमण कधी काढणार?
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.
मालेवाडा परिसर समस्यांच्या गर्तेत
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे.
भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा
चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूल मार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनांवर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.
गंजलेल्या विद्युत खांबांमुळे अपघाताचा धोका
आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे खांब बदलविण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.
आलापल्ली मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य
आष्टी : येथील आलापल्ली मार्गावर पेट्राेलपंपाच्या पुढे रस्त्याच्या कडेला माेठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. दुकानदार येथे कचरा टाकत असल्यामुळे डम्पिंग यार्ड बनले आहे.
गाेकुलनगर रस्त्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्यांची नगर परिषदेने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी या ठिकाणच्या नाल्या तुडुंब आहेत.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीज पुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.
ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ
गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज
धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटरी उपलब्ध करा
आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटरी चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटरी द्याव्यात, अशी मागणी आहे.
वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित
कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. मात्र कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते.