चौकशीची मागणी : महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोपअहेरी : आलापल्ली वन विभागाचे उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल हे महिला कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून मानसिक त्रास देत आहेत. त्यामुळे त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वनकर्मचारी संघटनांकडून उपवनसंरक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांच्या जाचाला कंटाळून वनकर्मचारी संघटनांनी त्यांच्याबद्दलची तक्रार उपवनसंरक्षक हेमंतकुमार मिना यांच्याकडे ९ जून रोजी केली होती. त्यावेळी मिना यांनी अग्रवाल यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र १० दिवसांचा कालावधी उलटूनही मिना यांनी चौकशी समिती गठित केली नाही. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी याबद्दलची तक्रार २६ जून रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही केली आहे. अग्रवाल यांच्यावर अजूनही कारवाई झाली नसल्याने वन विभागाचे अधिकारी त्यांची पाठराखण करीत असल्याचा आरोप वनकर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे.याबाबत उपवनसंरक्षक मिना यांच्यासोबत संपर्क साधला असता, काही वनकर्मचाऱ्यांनी आपल्याकडे तक्रार केली आहे. त्यानुसार चौकशी समिती नेमण्यात आली आहे. याबाबत मुख्य वनसंरक्षकांनाही कळविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आपण जास्त बोलू शकत नाही, अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली. उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांना विचारणा केली असता, आपण कर्मचाऱ्यांना कामाबाबतच बोलत असून ज्या कर्मचाऱ्यांना काम करणे जड जाते, असे कर्मचारी आपल्याबद्दल तक्रार करीत असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
आलापल्लीच्या एसीएफवर कारवाई करा
By admin | Published: August 03, 2015 1:06 AM