पत्रकार परिषद : लालचंद जनबंधू यांची मागणीगडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भांडारकर यांनी माझा मुलगा अंकेश जनबंधू याला मारहाण करून १४ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोडला. त्याचबरोबर त्याचे शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मुख्याध्यापक भांडारकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी लालचंद जनबंधू यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. अंकेश जनबंधू हा गोंडवाना सैनिकी विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. यावर्षी अंकेशच्या वर्गाची शैक्षणिक सहल कन्याकुमारी येथे जाणार होती. छायाचित्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी कॅमेरे पकडावे, असे निर्देश मुख्याध्यापकांनी दिले. त्यानुसार लालचंद जनबंधू यांनी फोटो काढण्यासाठी अंकेशला चांगल्या दर्जाचा मोबाईल घेऊन दिला. याबाबतची माहिती मुख्याध्यापक भांडारकर यांना माहित होताच त्यांनी अंकेशला १२ आॅक्टोबरच्या रात्री कक्षात बोलावून बेदम मारहाण केली. त्यानंतर अंकेशजवळ असलेला मोबाईल दगडाने ठेचून पूर्णपणे फोडला आहे. दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर ६ नोव्हेंबर रोजी अंकेशला घेऊन लालचंद जनबंधू हे विद्यालयात गेले. झालेल्या घटनेबाबत जनबंधू यांनी मुख्याध्यापक भांडारकर यांना विचारणा केली असता, मारहाण करून मोबाईल फोडल्याचे मान्य केले. मोबाईलची किंमत भरून देण्यास नकार दिला. एवढेच नाही तर अंकेशची शैक्षणिक कारकीर्द पूर्णपणे संपविण्याची धमकीसुद्धा दिली. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याशिवाय विद्यार्थी सांभाळणे अशक्य असल्याचे सांगितले. विद्यार्थ्याला मारहाण करणे, शैक्षणिक कायद्याच्या विरोधात आहेत. अंकेशचे जर काही चुकले असेल तर त्याला समज देऊन थोडी मारहाण करण्यास आपलाही विरोध नाही. मात्र अंकेशला बेदम मारहाण केली आहे. व शैक्षणिक नुकसान करण्याचीही धमकी दिली आहे. त्यामुळे भांडारकर यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी लालचंद जनबंधू यांनी केली आहे.
भांडारकर यांच्यावर कारवाई करा
By admin | Published: November 11, 2014 10:41 PM