कर्मचाऱ्यांचा मुख्यालयाला खो
सिराेंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या गावांतील शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत, तलाठी, प्राथमिक आरोग्य केंद्र, कृषी विभाग, वीज कर्मचारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय व इतर क्षेत्रांत कार्यरत काही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यामुळे सामान्य नागरिकांची कामे खोळंबत आहेत. अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागातील अनेक कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. वारंवार नाेटीस बजावूनही सुधारणा झाली नाही.
सौरदिवे बंद; गावात अंधार
सिरोंचा : वीज नसलेल्या दुर्गम गावांत उजेड पाडण्यासाठी प्रशासनाने दोन ते तीन वर्षांपासून शासनाच्या निधीतून सौर पथदिवे लावले. पथदिव्यांच्या बॅटऱ्यांमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश गावे अंधारातच रात्र काढत आहेत. तातडीने उपाययाेजना हाेणे गरजेचे आहे.
फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव
अहेरी : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावांत फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आलापल्ली शहरातही नाल्यांचा उपसा नियमित हाेत नाही. प्रशासनाने याबाबत नियाेजन करणे गरजेचे आहे.
हडकुळ्या पशुधनाला ग्राहक मिळेना
अहेरी : जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र, अनेकांकडे हडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनास सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक पशुपालक पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत.
आरमोरीत वसतिगृह निर्मिती करा
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांनी आहे.