आमदारांची मागणी : शवविच्छेदनास विलंब झाल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथील वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्यांचे शवविच्छेदन करण्यास विलंब झाल्याने चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी व मुलचेराचे तहसीलदार यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.आ.डॉ. देवराव होळी यांनी म्हटले आहे की, मुलचेरा तालुक्यातील धन्नूर येथे वीज कोसळून ४ जण मृत्यूमुखी पडले व सात जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आपण आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात भेट देवून जखमींची विचारपूस केली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर धन्नुर येथे जावून मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी गावात एकच शव पोहोचले होते. मृतक पिता - पुत्र व एकाचे शव अहेरी येथील शवविच्छेदनगृहातून धन्नूर येथे पोहोचण्यास वेळ लागणार असल्याचे कळले. यामुळे आपण अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात पोहोचलो. या ठिकाणी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार आधिपासूनच उपस्थित होते. यावेळी आपण बराच वेळ उपस्थित होतो. मात्र चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी व मुलचेराच्या तहसीलदारांनी भेट न दिल्यामुळे शवविच्छेदनास विलंब झाला. मुलचेरा येथील तहसीलदार व चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी यांनी धन्नूर येथे मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांना भेट देऊन निघून गेले. यामुळे नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. धन्नूर येथे एकाच कुटूंबातील पिता - पुत्र व दोन कुटुंबातील जीव गेला. मात्र तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी मृतकांच्या कुटुंबीयांबद्दल उदासिनता दाखविली असल्याचेही म्हटले आहे.अहेरी येथील शवविच्छेदनगृहात आ. डॉ. होळी, जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार उपस्थित झाले. मात्र उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार वेळेवर उपस्थित झाले नाही. यामुळे शवविच्छेदनास बराच विलंब झाला. यामुळे मृतकांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे या अधिकार्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.
चामोर्शीचे एसडीओ व मुलचेरा तहसीलदारांवर कारवाई करा
By admin | Published: June 12, 2017 1:00 AM