लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात अवैध दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुक्तिपथ अभियानाच्या समन्वयातून कृती करावी. ग्रामीण भागासह शहरी भागातीलसुद्धा दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत जिल्हा दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिल्या. मुक्तिपथ अंतर्गत जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांची कार्यशाळा पोलीस अधीक्षक कार्यालयात बुधवार १० फेब्रुवारीला पार पडली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, उपसंचालक संतोष सावळकर, डॉ. नंदू मेश्राम, पोलीस अधिकारी व मुक्तिपथ तालुका कार्यकर्ते उपस्थित होते. तर काही उपविभागीय पोलीस अधिकारी, ठाणेदार, प्रभारी अधिकारी ऑनलाईन जुळले होते. मुक्तिपथ हा महाराष्ट्र शासनाचा मॉडेल कार्यक्रम असून गडचिरोली जिल्ह्यात सुरु करण्यात आलेला महत्वाचा कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री स्वतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्याला दारू, तंबाखू नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम देण्यात आला आहे. त्याचा दर महिन्याला आढावा घेतला जाईल. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मी स्वतः पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. याच अनुभवातून गडचिरोली जिल्ह्यात असलेल्या मुक्तिपथ या विशेष नियोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिक चांगले काम करता येईल, असेही गोयल म्हणाले. याप्रसंगी डॉ. मयूर गुप्ता यांनी मुक्तिपथची माहिती दिली. दारू व तंबाखू विक्रीचे प्रमाण कमी करण्यासाठी असलेला कृती आराखडा सादर केला. दारू विक्रीचे अधिक प्रमाण असलेल्या गावांची यादी मुक्तिपथने पोलीस विभागाला दिली. त्यापैकी गाव संघटनांच्या माध्यमातून किती गावांमध्ये अहिंसक कृती करण्यात आली. सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली.
ॲक्शन प्लॅन राबवाग्रामीण भागात गाव संघटनांच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांविरोधात कृती केली जात आहे. मात्र, शहरात अवैध दारू विक्रीचे प्रमाण अधिक झाले असून दारूविक्री राेखण्याबाबत सूचविले. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी मुक्तिपथच्या कामाचे काैतुक करीत पोलीस व मुक्तिपथने तयार केलेल्या ‘ॲक्शन प्लॅन’नुसार कारवाई करीत दारू व तंबाखूविक्रीचे प्रमाण कमी करणार असल्याचे सांगितले.