पत्रकार परिषदेत मागणी : येनापूर येथील घटना; आंदोलनाचा इशाराचामोर्शी : येनापूर येथील शासनाच्या आबादी जागेवर मागील २५ वर्षांपासून अतिक्रमण करून राहत असलेल्या तीन कुटुंबांची घरे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे पाडली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पीडित महिलांनी दिला आहे. सोमनपल्ली ग्रामपंचायती अंतर्गत येनापूर हे गाव येते. या गावातील आबादी जागेवर जवळपास ७० कुटुंब अतिक्रमण करून वास्तव्यास आहेत. २०१३-१४ मध्ये या घरांचे घरटॅक्सही सुरू करण्यात आले. मात्र सोमनपल्लीचे तत्कालीन सरपंच नीलकंठ निकाळे, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील लोमा गेडाम यांनी आमची घरे अतिक्रमणात बांधली आहेत, असे सांगून घरे पाडण्यात आली. त्यामुळे आमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. याबाबत तहसील कार्यालय चामोर्शी, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर आमच्याकडून तीन हजार रूपये दंड वसूल करण्यात आला व या ठिकाणी आपण झोपड्या बांधून राहण्यास सुरूवात केली असता, तलाठी श्रीरामे यांनी ही जागा दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले. त्यानुसार दुर्गापूर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज केला असता, त्या जागेचा ग्रामपंचायतीकडे दस्तावेज नसल्याचे सांगितले. ११ जानेवारी रोजी दुर्गापूर ग्रामपंचायतीने कोणतीही नोटीस न देता जेसीबी लावून आणखी घरे पाडली. त्यामुळे पुन्हा आपण बेघर झालो आहोत. यासाठी जबाबदार दोन्ही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मनिषा विनायक राऊत, पद्मा बंडू गडलवार, निर्मलाबाई आत्माराम कुरखेडे यांनी केली आहे. अन्यथा तहसीलसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)
घरे पाडणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2016 1:08 AM