गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने. वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
काेरची तालुक्यात पेट्रोलची अवैध विक्री सुरूच
काेरची : तालुक्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लिटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.
मामा तलावांमधील अतिक्रमण कायमच
गडचिराेली : अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. गडचिरोली शहरातील गोकुलनगर लगतच्या तलावात अतिक्रमणधारकांनी पक्के घरे बांधली आहेत.
शासकीय जागेवर अनेकांचे अतिक्रमण
भामरागड : तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात विविध ठिकाणच्या शासकीय जागेवर शेकडो नागरिकांचे अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे. अनेक धनाढ्य लोक प्लाॅट पाडून विक्रीचा धंदाही करीत आहेत. मात्र याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
राजीव गांधी सभागृहात घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात.
अनेक निराधारांचे मानधन थकीत
आरमाेरी : जिल्हाभरातील अनेक निराधार नागरिकांना मागील दोन महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. शासनाकडून अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जाते. त्यातही ते नियमितपणे दिले नाही. त्यामुळे आर्थिक अडचण वाढत असून प्रत्येक महिन्याला नियमितपणे मानधन द्यावे, अशी मागणी आहे.
लोहारा-रांगी मार्गावरील झाडे तोडण्याची मागणी
आरमोरी : लोहारा ते रांगी, पिसेवडधा ते रांगी या रस्त्यावर अनेक झाडे रस्त्यावर आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येते. वनविभागाने या झाडांची तोड करावी, अशी मागणी आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते.
अल्पवयीन वाहनधारकांवर कारवाई करा
कुरखेडा : शहरातून मोठ्या प्रमाणात भरधाव वेगाने वाहने चालवली जात आहेत. मात्र याकडे वाहतुक पोलीसांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघातही घडलेले असून, भरधाव वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे.