वडिलाची मागणी : ठाणेदारांना दिले निवेदन एटापल्ली : माझा मुलगा नामदेव ओक्टूजी ओंडरे हा निवडणूक कर्तव्यावर असताना पोलीस उपनिरिक्षक मदने यांनी त्याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस उपनिरिक्षक विश्राम मदने याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी मृतक नामदेव ओंडरे यांचे वडील ओक्टूजी मलिग्या ओंडरे यांनी पोलीस निरिक्षक एटापल्ली यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात वडील ओक्टूजी ओंडरे यांनी म्हटले आहे की, माझा मुलगा नामदेव ओंडरे हा भगवंतराव आश्रमशाळा भापडा येथे कार्यरत होता. २१ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचे काम पार पाडून परत येत असताना बारसेवाडा गावाजवळ माझ्या मुलाने आपली प्रकृती अस्वस्थ आहे, असे पीएसआय मदने यांना सांगितले. त्यानंतर काहीच ऐकून न घेता पीएसआय मदने यांनी माझ्या मुलास लाथा बुक्यांनी मारहाण केली. उपचारादरम्यान २२ फेब्रुवारीला नामदेव याचा दवाखाण्यात मृत्यू झाला, असे वडिलाने म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन पीएसआय मदने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात पीएसआय मदने यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. (प्रतिनिधी)
मुलास मारझोड करणाऱ्या पीएसआयवर कारवाई करा
By admin | Published: March 19, 2017 2:01 AM