गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
विटा बनविण्याच्या कामास गती
देसाईगंज : तालुक्यात घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात विटांची निर्मिती केली जाते. हिवाळ्यात विटा बनविण्यासाठी पाेषक वातावरण असल्याने विटा बनविण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.
जि.प.समोर अतिक्रमण पुन्हा वाढले
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र, या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत. या परिसरात आता जिल्हा परिषदेकडून शाॅपिंग काॅम्प्लेक्स उभारले जाणार आहे. मात्र, महसूल विभागाच्या जागेवरील अतिक्रमण कायम आहे.
मालेवाडा परिसर समस्यांच्या विळख्यात
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे.
जिल्हाभरात जळाऊ लाकडांचा तुटवडा
गडचिरोली : जिल्हाभरातील वन विभागाच्या डेपोमध्ये जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठीही लाकडे मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. लाकडांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे.
पशुपालन योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करा
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
लिंक फेलमुळे कामे होताहेत प्रभावित
अहेरी : केंद्र शासनाने विविध योजनांची प्रक्रिया व प्रशासकीय कामे ऑनलाइन केली आहेत. त्यामुळे योजनेचे अनेक लाभार्थी तसेच कर्मचारी सुद्धा बरीच कामे ऑनलाइन स्वरूपात करीत आहेत. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून बीएसएनएल तसेच खासगी कंपन्यांची लिंक फेल होत असल्याने ऑनलाइन कामे प्रभावित होत आहे.
चातगाव-रांगी मार्गे अवैध वाहतूक जोरात
चातगाव : चातगाव रांगी मार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करावी.
कार्यालयातील थम्ब मशीन सुरू करा
गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील थम्ब मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे थम्ब मशीन तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
निस्तार डेपो देण्याची मागणी धूळखात
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावात त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी होत आहे. चामोर्शी भागातील नगारिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी इतर ठिकाणाहून लाकडे आणावी लागत आहेत.
मंजूर टॉवर तत्काळ बांधण्याची मागणी
गडचिरोली : बीएसएनएलने गडचिरोली जिल्ह्यात नवीन ९० टॉवर मंजूर केले आहेत. या टॉवरचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी होत आहे. बीएसएनएलने टॉवर उभारल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोबाइल सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
प्रभारी लाइनमनमुळे नागरिकांना त्रास
अहेरी : जिल्ह्यातील बहुतांश गावात लाइमनकडे अनेक गावांचा पदभार आहे. आता उन्हाळा सुरू असला तरी दिवसामागे वीज जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वीज सुरळीत करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक गावासाठी लाइनमन द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा
कुरखेडा : नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने अडचणी आहेत.
धूर फवारणी करण्याची मागणी
गडचिराेली : शहरातील काही वाॅर्डांत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.
कर्मचाऱ्यांचे अपडाऊन सुरू
गडचिराेली : तालुक्यासह उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, कोरची व कुरखेडा तालुक्यांच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अपडाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत नागरिक अनभिज्ञ
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र, या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
सौरऊर्जा पंपांची गावांना प्रतीक्षा
गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा. पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थींची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र, काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.