गडचिरोली : गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात अगदी रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने पार्क केली जातात. सदर वाहनांवर कारवाई होत नसल्याने. वाहने रस्त्यावर लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाहनांवर कारवाई करण्याची मागणी आहे.
ग्रामीण भागात पेट्रोलची अवैध विक्री सुरूच
गडचिरोली : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लीटरमागे २० ते ३० रूपये जादा उकळतात.
शहरातील अनेक वार्डात सट्टापट्टी जोमात
देसाईगंज : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादात लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसूली करीत आहेत. मात्र याकडे देसाईगंज पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. सकाळपासूनच सट्टापट्टी लावण्यास सुरूवात होते.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविनाच
कोरची : शासनाच्या आग्रहानंतर शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीज पुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळखात पडून आहेत. काही शाळांना वीज पुरवठा होता. मात्र वीज बिल भरला नसल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. त्यामुळे आता संबंधित शाळा विजेविनाच सुरू आहेत. डिजिटल साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी शाळांमध्ये वीज पुरवठा आवश्यक झाला आहे.
विटा बनविण्याच्या कामास वेग
देसाईगंज : हिवाळ्याला सुरूवात झाली असल्याने घर बांधकामाला ग्रामीण भागात वेग आला आहे. देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात विटांची निर्मिती केली जाते. मार्च ते मे हा कालावधी विटा बनविण्यासाठी योग्य मानला जात असल्याने विटा बनविण्याच्या कामास वेग आला आहे.
गौरक्षण संस्थेच्या निर्मितीची मागणी
गडचिरोली : गडचिरोली शहरात गोरक्षण संस्था नाहीत. त्यामुळे अनेकदा बेवारस जनावरे तसेच कतलीसाठी जात असलेले जनावर पकडून चंद्रपूर जिल्ह्यात लोहारा येथे पाठवावे लागतात. गौरक्षण संस्था निर्माण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
जि.प. समोरील अतिक्रमण वाढतीवरच
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजुला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.