सिरकोंडात मेळावा : आशिष चौधरी यांचे आवाहनबामणी : शासनाने विविध विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यान्वित केला आहे. या योजनांचा लाभ घेऊन कुटुंब व गावांचा विकास साधा, असे आवाहन बामणी उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष चौधरी यांनी केले.उपपोलीस स्टेशन बामणीच्या वतीने मंगळवारी सिरकोंडा येथे जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिरकोंडाच्या सरपंच गावडे, उपसरपंच लक्ष्मण गावडे, मंडळ अधिकारी गडपल्लीवार, तलाठी राहुल पोरतेट, माजी सरपंच मासा वाकडे, दोडके, कुमरे, अशोक तक्कमवार आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने गरजू व्यक्तींना कपडे, मुलांना क्रीडा साहित्य, महसूल विभागामार्फत सातबारा, ग्रामपंचायतीमार्फत विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले. याशिवाय आरोग्य विभागामार्फत नागरिकांची आरोग्य तपासणी करून औषणीचे वितरण करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व नागरिकांकडून योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी पेसा कायद्याची अंमलबजावणी व सहकार विभागाच्या कर्ज योजनांची बचत गटांना माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोंगाळे, राहुल वाघमारे यांनी केले तर आभार सत्यनारायण वेलादी यांनी मानले. (वार्ताहर)
शासकीय योजनेचा लाभ घेऊन विकास साधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2016 12:11 AM