गडचिराेली : रासायनिक खतांच्या अवाढव्य वापरामुळे शेतजमिनीचा पाेत घसरताे. शेतजमीन नापीक हाेण्याचा धाेका असताे. हा धाेका ओळखून कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना दरवर्षी माती परीक्षणाचा सल्ला दिला जाताे. तरीही बहुतांश शेतकरी माती परीक्षण करीत नाही. त्यामुळे प्रश्न पडताे शेतकरी जसे आपले आराेग्य सांभाळताे तसे शेतजमिनीचे का नाही? असे असतानाही वर्षभरात जिल्ह्यात ४ हजार ५९ शेतकऱ्यांना जमीन आराेग्य पत्रिका वाटप केल्या.जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी अधिकारी कार्यालयार्फे गडचिराेली जिल्ह्यात राष्ट्रीय कृषी विकास याेजना (आरकेव्हीवाय), राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कापूस उत्पादकता वाढ अमूल्य सांख्यिकी याेजना व सेंद्रिय शेती याेजनेच्या माध्यमातून माती परीक्षण केले जाते. याशिवाय काही शेतकरी वैयक्तिकरित्या माती परीक्षण प्रयाेगशाळेद्वारे करतात.
चार प्रकारच्या तपासण्या; शुल्क किती?
प्रयाेगशाळेत चार प्रकारच्या तपासण्या केल्या जातात. सर्वसाधारण मृद नमुना तपासणीत पुन्हा सहा तपासण्या ३५ रुपये प्रतितपासणी प्रमाणे केली जाते. सूक्ष्म मुलद्रव्य नमुने तपासणीत सहा घटकांची तपासणी ५० रुपये प्रतितपासणी हाेते. विशेष नमुना तपासणीमध्ये २१ प्रकारच्या टेस्ट २७५ रुपयांत केल्या जातात. पाणी नमुना तपासणीत शेतातील पाणी १० टेस्टद्वारे ५० रुपये प्रतितपासणीप्रमाणे केली जाते.
वार्षिक क्षमता ७६०० नमुन्यांची
जिल्हास्तरीय शासकीय प्रयाेगशाळांमध्ये माती नमुने तपासणी वार्षिक क्षमता ७ हजार ६०० ची आहे. परंतु यापेक्षा अधिक नमुने प्रयाेगशाळेत येतात. गेल्या वर्षभरात २ हजार ३९ माती नमुने नागपूरच्या विभागीय कृषी सह संचालनालयामार्फत नाेंदणीकृत खासगी प्रयाेगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठविले आहेत, असे कृषी पर्यवेक्षक सुनील बुद्धे यांनी सांगितले.
वैयक्तिक ८५४ नमुने तपासले
२०२२-२३ या वर्षात शासकीय याेजनांच्या माध्यमातून ३ हजार १९५ शेतकऱ्यांच्या मातीचे नमुने तपासून त्यांना जमीन आराेग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले तर वैयक्तिकरित्या नमुने आणून देणाऱ्या ८५४ शेतकऱ्यांच्या शेतीचे माती परीक्षण अशाप्रकारे एकूण ४ हजार ५९ शेतकऱ्यांचे नमुने तपासून त्यांना जमीन आराेग्यपत्रिका वितरीत करण्यात आल्या. विशेष म्हणजे, सेेंद्रिय शेतीचे ३८५ नमुने घेण्यात आले.
जमिनीत उपलब्ध पाेषक तत्त्वांनुसारच पिकांची वाढ हाेते. आपल्या शेतात काेणती सूक्ष्म मुलद्रव्ये आहेत व काेणती नाहीत, हे माती परीक्षणाद्वारे कळते. त्यानुसार खत व्यवस्थापन करता येते. पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी हंगामापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे.- गणेश बादाडे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी