पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यांनाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
खरपुंडी मार्ग अरुंदच
गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत असली, तरी याकडे दुर्लक्ष होत आहे. या मार्गावर अपघाताची शक्यता बळावली आहे.
सिंचन सुविधेचा अभाव
सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर परिसरात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे धान पीक करपते. या क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे, परंतु या मागणीकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
अनेक रस्ते खड्डेमय
अहेरी : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्यापही पोहोचली नाही. या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे.
लाइनमनची पदे भरा
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राइस मिल, आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो, परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते, तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे. त्यामुळे लाइनमनची पदे भरावी.