गडचिराेली : तालुक्यातील आंबेशिवणी, जेप्रा, दिभना, चुरचुरा, गाेगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वाघाने धुमाकुळ घातला असून आजपर्यंत ११ शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. शिवाय अनेकजण जखमीही झाले आहेत. वाघाच्या या दहशतीमुळे शेतकरी व नागरिक अडचणीत आले आहेत. प्रशासनाने ठाेस पावले उचलून धुमाकुळ घालणाऱ्या वाघांचा तातडीने बंदाेबस्त करावा, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, भाजपचे तालुकाध्यक्ष तथा पं. स. सदस्य रामरतन गाेहणे यांनी केली आहे.
या संदर्भात २६ ऑगस्ट राेजी त्यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी संजय मीना यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते बालाजी जेंगठे व शेतकरी हजर हाेते.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील चुरचुरा, गाेगाव( अडपल्ली), गिलगाव, राजगाटा, धुंडेशिवणी, उसेगाव, पाेर्ला, कळमटाेला, पिपरटाेला, मुरमाडी आदी गावांमध्ये वाघांचा धुमाकुळ सुरू आहे. या भागात झुडपी जंगलालगत शेती आहे. वाघाने आजपर्यंत ११ शेतकऱ्यांचा बळी घेतला असून ४ शेतकरी जखमी झाले आहेत.
बाॅक्स ......
कोणता वाघ नरभक्षक?
गडचिराेली तालुक्याच्या झुडपी जंगलात एकूण किती वाघ आहेत, आणि त्यापैकी काेणता वाघ नरभक्षक झाला आहे याबाबत वन विभाग अनभिज्ञ असल्याचे दशमुखे यांनी निवेदनात म्हटले आहे. वन विभागाकडून नरभक्षक वाघाबाबत अद्याप काेणतीच कारवाई झालेली नसल्यामुळे हा धोका पुढेली कायम राहू शकतो.