ध. ज. पाटील यांचे प्रतिपादन : चामोर्शीत कायदेविषयक शिबिर चामोर्शी : शासनाने सर्वांना मोफत शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिला असून त्यासाठी ग्रामीण भागातील मुले, अज्ञात गरीबी अशा विविध कारणांनी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन चामोर्शीचे दिवाणी न्यायाधीश ध. ज. पाटील यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व तालुका समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ३० डिसेंबर रोजी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात ‘संविधानिक अधिकार व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण’ या विषयावर कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून न्यायाधिश ध. ज. पाटील बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य ज्ञानेश्वर म्हशाखेत्री, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. अनंत उंदीरवाडे, अॅड. डी. एच. गयाली, सहायक शासकीय अभियोक्ता दोनाडकर, अॅड. एम. डी. सहारे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. भुपेश चिकटे आदी मान्यवर उपस्थित होते. संचालन ब्राह्मणवाडे, आभार प्रा. डॉ. भुपेश चिकटे यांनी मानले. यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. संजय म्हस्के, प्रा. बावणे, प्रा. आंबटकर, प्रा. वंदना थुटे, प्रा. शितला बुर्लावार, प्रा. मिनल गाजलवार, प्रा. दिपीका हटवार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी इतरही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)
सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा
By admin | Published: January 01, 2017 1:28 AM