चामोर्शी : तालुक्यातील शेतकरी मुख्यत्वे खरीपात धान पीक लागवड करीत असतात. मात्र, दिवसेंदिवस शेतकरी मका पीक लागवड करीत असून, शेतकरी मका पीक लागवडीकडे वळल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात गतवर्षीपेक्षा यावर्षी मका पिकाची लागवड वाढली आहे.
सध्या मका पीक हाती आले आहे. घरासमोर येऊन मका घ्या मका, असा आवाज देऊन शेतकरी वार्डा-वार्डात, मोहल्ल्यात, गावागावात सायकल, मोटार सायकलवरून येऊन ओला मका विक्रीसाठी सकाळी व दुपारी ४ वाजण्याच्या वेळेत दिसून येत आहेत. मका विक्रीसाठी शहरातील मुख्य चौका-चौकात, बसस्टॉप परिसरात अशा ठिकाणी बसून मका विकला जात आहे. खरीप हंगामात मका पिकाची लागवड करण्यात आली. सध्या कोरोना महामारीचे संकट आहे. त्यामुळे बरेचजण कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत. अशा अवस्थेत निघालेल्या मालाची विक्री करणे कठीण जात असताना उत्पादन जास्त असल्याने मका विक्रेते प्रतिकिलो १५ ते २० रुपये दराने विक्री करीत आहेत. चामोर्शी- भिवापूर क्रॉसिंग घोट मार्गावर मका भाजून लिंबू, तिखट, मीठ लावून प्रतिनग १० रुपयेप्रमाणे रस्त्यावरून जाणारे - येणारे फिरायला गेलेले नागरिक भाजलेल्या मक्याचा आस्वाद घेत आहेत. मका तसा सर्वांच्या आवडीचा पदार्थ. मक्याचे भाजलेले कणीस, उकळलेला मका, मक्याचे दाणे काढून ते तव्यावर भाजून फ्राय करून सर्वजण आवडीने खात असतात . मका पौष्टिक आहे. अशा गुणकारी मका पिकाचे क्षेत्र तालुक्यात दिवसेंदिवस अधिक वाढत चालले आहे.