प्रेस क्लब संघटनेची मागणी : जिल्हाधिकारी व एसपींना पत्रकारांचे शिष्टमंडळ भेटले लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : एका प्रादेशिक वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी किशोर मेश्राम यांच्यावर ८ जुलै रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी देसाईगंज पोलिसांनी कुरुड येथील क्षितीज कमलेश उके या हल्लेखोराला अटक केली असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी क्षिती उके यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे. प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेश नगराळे, पत्रकार रोहिदास राऊत, प्रा. अनिल धामोडे, अरविंद खोब्रागडे, शेमदेव चापले, रूपराज वाकोडे आदींनी जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांची सोमवारी भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायदा तत्काळ कायदा लागू करावा, कोरची व देसाईगंज येथील पत्रकारांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी नायक, पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांना निवेदन देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत गांभीर्याची चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यातील पत्रकारांवर हल्ले होणार नाहीत. यासाठी नवीन पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुड्डमवार, जिल्हा कार्याध्यक्ष मनीष कासर्लावार, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण चन्नावार आदी उपस्थित होते. आरोपीच्या मोबाईलचा सीडीआर काढा घटना घडण्यापूर्वी व घटना घडल्यानंतर देसाईगंज पोलीस ठाण्यातील एका पोलिसासोबत आरोपीचा सतत संपर्क होता, अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी किती लोकांचा सहभाग आहे. याचा उलगडा होण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या मोबाईल नंबरचा सीडीआर काढून त्या दिशेने तपास करावा, अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. आरोपीने त्या पद्धतीने पत्रकार किशोर मेश्राम यांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला चढविला. यावरून मेश्राम यांना जिवानिशी ठार करण्याचा आरोपीचा बेत होता, असे पत्रकारांनी म्हटले आहे.
पत्रकारांवरील हल्लेखोरावर कठोर कारवाई करा
By admin | Published: July 12, 2017 1:37 AM