गडचिराेली : प्रत्येक गावात शिवसेनेच्या(शिंदे गट) नवीन शाखांची बांधणी करून पक्ष मजबूत करा. नवीन शाखेत येण्यास जुने शिवसैनिक तयार असतील तर त्यांना साेबत घ्या. मात्र त्यांच्यावर महाविकास आघाडीच्याच विचारांचा प्रभाव असेल तर त्यांना तेथेच ठेवा, असे आवाहन शिवसेनेचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठाेड यांनी येथे केले.
शिवसेनेच्या मुख्यमंत्री शिंदे गटाकडून शुक्रवारी गडचिरोलीत पहिला वहिला कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गडचिराेली शहरातून काढलेली शिवगर्जना यात्रा लक्षवेधी ठरली. यानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या सभेला माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतारे, विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव, जिल्हा संपर्कप्रमुख संदीप बरडे, सहसंपर्क प्रमुख हेमंत जम्बेवार, जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे, जिल्हा संघटक राजगाेपाल सुल्वावार, महिला आघाडी प्रमुख अमिता मडावी, पाैर्णिमा इष्टाम, उपजिल्हा प्रमुख अविनाश वरगंटीवार, गाैरव बाला, पप्पी पठाण, वसंत गावतुरे, नीलेश बाेमनवार, सुशांत भाेयर आदी प्रामुख्याने मंचावर उपस्थित हाेते.
यावेळी ना. राठोड म्हणाले, सध्या शिवसैनिक द्विधा मन:स्थितीत आहेत. शिवसेना ही काेणा एका व्यक्तीची नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेणारा व्यक्तीच खरा शिवसैनिक असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा परिषद हे प्रथम लक्ष्य
- दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक हाेणार आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार माेर्चेबांधणी करण्याचे आवाहन यावेळी ना.राठोड यांनी केले. विदर्भ संपर्कप्रमुख किरण पांडव यांनी लवकरच गडचिरोली जिल्ह्यात पक्षविस्तारासाठी सर्व नियुक्त्या करणार असल्याचे सांगितले.
- सेनेच्या शिंदे गटाचा हा पहिलाच मेळावा हाेता. त्यामुळे मेळाव्याला व रॅलीला गर्दी हाेणार की नाही अशी शंका उपस्थित केली जात हाेती. मात्र, जवळपास दाेन हजार शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित हाेते. नवीन पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने नियाेजन केल्याचे दिसून येत होते.