ऑनलाईन लोकमतअहेरी : शौचालय बांधकामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हैसकर यांनी पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यापासून आपल्या टेबलावर शौचालय असेल तरच बोला, अशी पाटी ठेवली आहे. सदर पाटी गट विकास अधिकाऱ्यांकडे येणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिक व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.स्वच्छ भारत करण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असणे आवश्यक असून संबंधित कुटुंबाने त्या शौचालयाचा वापर करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाकडून शौचालय बांधकामासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. तरीही ग्रामीण भागातील काही कुटुंब शौचालय बांधत नाही व बांधले तरी त्याचा वापर करीत नाही. परिणामी पंचायत समितीला शौचालय बांधकामाचे दिलेले उद्दिष्ट गाठण्यास अपयश येत आहे. ग्रामीण भागातील विविध योजनांची अंमलबजावणी पंचायत समितीच्या मार्फत केली जात असल्याने ग्रामीण भागातील शेकडो नागरिक पंचायत समितीमध्ये व गट विकास अधिकाऱ्यांकडे येतात. गट विकास अधिकाऱ्यांनी टेबलावरच शौचालय असेल तरच बोला, अशी पाटी लावली आहे. ही पाटी बघितल्याबरोबर ज्या व्यक्तीकडे शौचालय नाही. अशा व्यक्तीला शौचालय बांधण्याची आठवण होते. या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचे बांधकाम करण्यास व त्याचा वापर करण्यास प्रोत्साहित होत आहेत. गट विकास अधिकारी म्हैसकर यांनी सुरू केलेला हा अशा प्रकारचा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमांमुळे शौचालय बांधकामाची गती वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘शौचालय असेल तरच बोला’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:56 PM
शौचालय बांधकामाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी म्हैसकर यांनी पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यापासून आपल्या टेबलावर शौचालय असेल तरच बोला,...
ठळक मुद्देबांधकामाला मिळणार गती : अहेरीच्या गट विकास अधिकाºयांचा अनोखा उपक्रम