गडचिरोली : गौण उपवनोपजाचे स्वामित्व हक्क ग्रामसभेला देण्यात आले आहेत. या कायद्याचा आधार घेत पोटेगाव परिसरातील मारदा, काळशी, फुलबोडी, पोटेगाव युनिटमधील तेंदूपत्ता संकलन स्वत: करण्याचा निर्णय ग्रामसभांनी घेतला आहे. यामुळे हजारो नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून जवळपास एक महिन्याचा रोजगार प्राप्त होतो. यातून एक व्यक्तीला किमान १0 हजार रूपयाचे उत्पन्न प्राप्त होते. विशेष म्हणजे तेंदूपत्ता संकलन पावसाळ्याच्यापूर्वी केले जाते. या कालावधीत कोणतेही शेतीचे कामे राहत नसल्याने हजारो मजूर तेंदूपत्ता संकलन करतात. वनहक्क कायदा २00६, अधिनियम २00८ व पेसा कायदा १९९६ नुसार तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामसभांना देण्यात आले आहेत. या अधिकाराचा वापर करीत गडचिरोली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती स्वत: तेंदूपत्ता संकलन करीत आहेत. यावर्षी मारदा, काळशी, फुलबोडी, पोटेगाव, जमगावच्या ग्रामसभा महासंघाने लिंगु मनकु कोरामी यांच्या अध्यक्षतेखाली जमगाव येथे ग्रामसभेचे आयोजन केले. यामध्ये तेंदूपत्ता संकलनाचा रेट २६0 रूपये ठरविण्यात आला. दिवानजीला ६ हजार ८00 रूपये, चपराशी ५ हजार ६00 रूपये माधनधन ठरविण्यात आला. तेंदूपुड्याची उलटाई, पलटाई, छटकटाई प्रतिहजार ४0 रूपये दर ठरविण्यात आला. तेंदूपत्ता संकलन करतांना मजुरास इजा झाल्यास ५0 हजार रूपयाची मदत, हातपाय तुटल्यास २५ हजार रूपये व मृत्यू पावल्यास १ लाख रूपयाची मदत देण्यात यावी, असा ठराव या ग्रामसभांनी घेतला आहे. तेंदूपत्ता संकलनातून या ग्रामसभांना लाखो रूपयाचे उत्पन्न प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर परिसरातील नागरिक स्वत:च तेंदूपत्त्याचे मालक बनले आहेत. ग्रामसभेला शिवाजी नरोटे, नांगसू कुमरे, धर्मा धुर्वे, साधू नरोटे, सनकु उसेंडी उपस्थित होते.
ग्रामसभेच्यावतीने तेंदूपत्ता संकलन
By admin | Published: May 22, 2014 1:09 AM