‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान : ३,७९० शेतकऱ्यांना उत्पादकता प्रशिक्षण लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आत्मा विभागाच्या वतीने २५ मे ते ८ जून या कालावधीत शेतकरी प्रशिक्षण पंधरवडा साजरा करण्यात आला. चालू खरीप हंगामात प्रतीहेक्टरी ३२ क्विंटल धान उत्पादनाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी आत्मा, कृषी विज्ञान केंद्र तसेच तालुका कृषी अधिकारी विभागाच्या वतीने जिल्हाभरातील ३ हजार ७९० शेतकऱ्यांना धानाच्या लागवडीचे आधुनिक तंत्र समजावून सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात सुमारे पावणे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र पारंपरिक पद्धतीने धानपिकाची लागवड केली जात असल्याने दरहेक्टरी उत्पादकता अत्यंत कमी आहे. काही भागात हेक्टरी केवळ २० क्विंटल एवढेच उत्पादकता आहे. आधुनिक पद्धतीने शेती करून उत्पादकता वाढविण्याचा संकल्प कृषी विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. २५ ते ८ जून या कालावधीत जिल्हाभरात ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ अभियान राबविण्यात आले. या अभियानादरम्यान कृषी विज्ञान केंद्र, आत्मा तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात जाऊन शिबिर घेतले. या शिबिरादरम्यान आधुनिक पद्धतीने शेती करावी, याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र सोनापूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनात शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आवश्यक तेवढे खते, बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. शिबिरामुळे धानाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेक्टरी ३२ क्विंटल धान उत्पादनाचे उद्दिष्ट
By admin | Published: June 10, 2017 1:41 AM