- पांडुरंग कांबळेगडचिरोली- अलिकडे शिक्षकी पेशात सेवाभाव कमी आणि व्यवहारिकपणा जास्त आल्याचे म्हटले जाते. पण अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडीचे रहिवासी असलेल्या विजय कारखेले या तरुण शिक्षकाने तब्बल १४ वर्षे गडचिरोली जिल्ह्यात नोकरी करताना गावक-यांना दाखविलेली विकासाची दिशा गावक-यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. आंतरजिल्हा बदलीतून त्यांची आता पुणे जिल्ह्यात बदली झाली. यानिमित्त गावाच्या या विकासदूताला आदिवासी गावक-यांनी अनोख्या पद्धतीने वाजतगाजत निरोप देऊन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सेवेची आगळी भेट त्यांना दिली.जिल्ह्याच्या अविकसित मुलचेरा तालुक्यातील गरंजी हे गाव म्हणजे अतिदुर्गम क्षेत्र. गावाची लोकसंख्या जेमतेम अडीचशे. गावात पहिली ते चौथीपर्यंतची शाळा, पण गावात वीज नाही, जाण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नाही अशी स्थिती होती. शिक्षकी पेशाची सुरुवातीची चार वर्षे गडचिरोली जिल्ह्यातल्या गोविंदपूर गावात गेल्यानंतर २००८ मध्ये विजय कारखेले यांची बदली गरंजी या गावात झाली आणि त्यांनी तेथील परिस्थिती पाहून गावाच्या विकासाचा विडाच उचलला. सर्वप्रथम गावात वीज पुरवठा येण्यासाठी गावक-यांना घेऊन महावितरण कार्यालयाकडे पाठपुरावा केला आणि गावक-यांना पहिल्यांदा रात्रीचा प्रकाश पाहिला. गावक-यांना स्वखर्चाने गॅस सिलिंडर घेण्यासाठी प्रवृत्त केले. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी गावक-यांना जातीचे दाखले काढून दिले. पावसाळ्यात गावात प्रवेश करणे कठीण जात होते. त्यासाठी श्रमदानातून रस्ता दुरुस्त केला. विडी, तंबाखू, दारू गावातून हद्दपार करून गावाला १०० टक्के नशामुक्त केले. आधी राखी वृक्षाला या उपक्रमातून वृद्ध संवर्धनाचे महत्व गावक-यांना पटवून दिले. अशा विविध कामांमुळे कारखेले हे त्या गावासाठी विकासदूतच झाले होते. त्यांची बदली झाल्याचे समजताच संपूर्ण गावकरी भावुक झाले. गावावर केलेल्या उपकाराची आठवण ठेवून रविवारी (दि.२७) गावातल्या गोटूल भवनात कार्यक्रम घेण्याचे ठरले. आदिवासी ढोल, पारंपरिक नृत्य पथक व गावातील महिला-मुलींनी आदिवासी पद्धतीने नृत्य सादर करत जिल्हा परिषद शाळा ते गोटूल भवन अशी त्यांची मिरवणूक काढली. यावेळी गावात रांगोळ्या काढून घरोघरी मुख्याध्यापक विजय कारखेले यांना निरोप दिला जात होता. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. गावक-यांच्या व महीला बचत गटाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन कारखेले यांना निरोप देण्यात आला. या सोहळ्यासाठी केंद्र प्रमुख शरद बावणे, गट समन्वयक अमर पालारपवार, लालाजी हिचामी, तुकाराम पुंगाटी, किशोर हिचामी, शिक्षक रवींद्र मरस्कोल्हे, संदीप कुळमेथे, तुकाराम कंगाली,सुधाकर हिचामी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.भविष्यातही गरंजीसाठी धावून येणारया सत्कारप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापक कारखेले म्हणाले, अतिदुर्गम गरंजी गावातील आदीवासी बांधवांच्या सन्मानाने मी भारावलो. गरंजीशी आपले नाते अतुट असून जेव्हा गावाला गरज असेल तेव्हा या गावासाठी हजर होईल. पुणे, मुंबई येथील दानशूर संस्थांच्या माध्यमातून मानवसेतू निर्माण करून भविष्यात गरंजीच्या विकासाकरिता प्रयत्न करीत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
गरंजीच्या विकासदूतास आदिवासींचा अनोखा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 5:23 PM