गडचिरोली - भरधाव टाटा सफारी स्टोर्म हे चारचाकी वाहन उभ्या टिप्परवर धडकुन पाच महाविद्यालयीन विद्यार्थी ठार तर चार जण गंभीर जखमी झाले. हा अपघात नागपूर-गडचिरोली मार्गावरील चुरमुरा गावाजवळ रात्री 11 च्या सुमारास घडला.
मृतांमधे प्रशांत सुधाकर रणदिवे (रा. बल्लारशहा जि.चंद्रपूर), निहाल धनलाल प्रदीते (रा.आमगाव, जि.गोंदिया), प्रणय रमेश गेडाम (रा.आष्टी, जि.गडचिरोली), अंकित वेलादी (रा.कोटी) आणि वैभव पावे (पेंढरी, गडचिरोली) यांचा समावेश आहे. याशिवाय दीपक जयराम निमकर (वणी, जि.यवतमाळ), आकाश तडवी (जळगाव), जूनेद कादरी (करपना, जि.चंद्रपूर) व शुभम मंगरे (गडचिरोली) हे गंभीर जखमी झाले. त्यापैकी दोघांना चंद्रपूरला हलविल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोलीच्या कृषी महाविद्यालयाचे 9 विद्यार्थी रविवारी रात्री सफारी (एमएच 40, एसी 0332) या वाहनाने ने पार्टी करून परत गडचिरोलीकडे येत होते. भरधाव वेगात असलेली त्यांची गाडी चुरमुरा या गावाजवळ रस्त्यालगत नादूरूस्त होऊन उभ्या असलेल्या टिप्परवर धडकली. ही धडक इतकी भयंकर होती की सफारी गाडीचा चेंदामेंदा झाला आणि फरशीने भरलेला तो टिप्पर 10 फूट पुढे सरकला. त्यामुळे 5 जण जागीच ठार झाले. मृतदेह गाडीत फसल्याने ते काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.