रस्ता दुरवस्थेचा परिणाम : लोकप्रतिनिधींसह प्रशासनही कमालीचे सुस्तआष्टी/गुंडापल्ली : गडचिरोली जिल्ह्यात केवळ शहरी भागातील रस्ते चांगले आहेत. मात्र अहेरी उपविभागातील पाचही तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक दुर्गम गावांना राज्य परिवहन महामंडळाची बस पोहोचत नाही. परिणामी प्रवाशांना जीव धोक्यात घालून खासगी काळीपिवळी टॅक्सीने प्रवास करावा लागतो. सध्या महाशिवरात्रीनिमित्त मार्र्कंडादेव, चपराळा येथे यात्रा सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही स्थळाकडे जाणाऱ्या भाविक प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. याचा फायदा घेऊन काळीपिवळी टॅक्सीचालक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आपल्या टॅक्सीत कोंबून त्याची वाहतूक करीत आहेत. मात्र याकडे परिवहन विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अहेरी उपविभागात अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा या पाच तालुक्यात रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या उपविभागात अनेक रस्ते मंजूर करण्यात आले आहे. मात्र नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे अनेक ठिकाणचे रस्त्याचे काम रखडले आहे. अहेरी उपविभागात नदी, नाले असल्याने पुलाची गरज आहे. मात्र गडअहेरी नाल्यासह अनेक ठिकाणच्या नाल्यावरील पुलाची उंची फार कमी आहे. परिणामी पावसाळ्यात पुलावर पाणी चढत असल्याने वाहतूक पूर्णत: ठप्प होते. पावसाळ्यात अहेरी उपविभागात वाहतूक प्रभावीत होऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने चामोर्शी व अहेरी तालुक्याच्या दुर्गम भागात मोजक्या बसगाड्या सोडल्या जातात. त्यामुळे या भागात काळीपिवळी टॅक्सीची वाहतूक मोठ्या प्रमाणात चालते. काळीपिवळी टॅक्सीचालक नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची धोकादायक वाहतूक करतात. गेल्या दोन वर्षात या भागात काळीपिवळी टॅक्सी वाहनांना अनेकदा अपघात घडले. ही समस्या निकाली काढण्यासाठी रस्त्याची पुनर्बांधणी करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात अनेकदा मागणी करूनही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासन रस्ता सुविधेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. (वार्ताहर)
टॅक्सीतून सुरू आहे जीवघेणा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 2:10 AM