आरमोरी - माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी शुक्रवारी आरमोरी व धानोरा तालुक्याचा दौरा करून अनेक शाळांना भेट देऊन पाहणी केली. मुंगनेर येथील जि. प. प्राथमिक शाळेला सायंकाळी ४ वाजता त्यांनी भेट दिली असता एकही शिक्षक शाळेत उपस्थित नव्हते. स्वयंपाक करणारी बाई मुलांना सांभाळत असल्याचे चित्र दिसले. याबाबत चौकशी केली असता गावकऱ्यांनी शिक्षक उशिरा येतात व लवकर ४ वाजताच निघून जात असल्याचे सांगितले. त्यामुळे, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.
एकीकडे जिल्हा परिषदशाळांच्या विकासासाठी सरकारला सातत्याने धारेवर धरले जाते. झेडपी शाळेत सुविधांचा अभाव, जुन्या इमारती आणि शिक्षणाचा दर्जा ढासळल्यामुळे पालक आपल्या मुलांना खासगी, इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये दाखल करतात, अशी ओरडही आहे. पालकांची ही चिंता काही शिक्षकांच्या वागण्यामुळे खरीही ठरत आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या आरोमोरी तालुक्यातील मुंगनेर येथे १ ते ४ वर्गापर्यंत शाळा असून, शाळेची इमारतही जुनी आहे. शाळेची दुरवस्था झाली असून, शाळेजवळ पाण्याचे डबके साचलेले आहे.
मुंगनेर येथील शाळेला माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी भेट देऊन पाहणी केली असता दोनपैकी एक शिक्षक रजेवर होते तर दुसरे शिक्षक चार वाजताच निघून गेल्याने स्वयंपाक करणारी बाई सुटी होईपर्यंत विद्यार्थ्यांना सांभाळत होती. कामनगड, बोधिन, सावंगा, पेंढरी, गठ्ठा या भागातील रस्त्याची पाहणी केली असता या भागातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते ठिकठिकाणी उखडलेल्या स्थितीत दिसून आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सदर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.