आनंददायी शिक्षण : सातारा जिल्ह्यातील कुमठे बिटात अभ्यास दौराअहेरी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत अहेरी पंचायत समितीच्या शिक्षकांनी अभ्यास दौऱ्याअंतर्गत १०० टक्के गुणवत्ताप्राप्त सातारा जिल्ह्यातील कुमठे बिटाला भेट देऊन ज्ञानरचनावादाची पद्धत समजून घेतली. महाराष्ट्र शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा नावीण्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. सातारा जिह्यातील कुमठे बिटातील विद्यार्थी १०० टक्के गुणवत्ताप्राप्त आहेत. विद्यार्थी ज्ञानरचनावाद पद्धतीने शिक्षण घेत असल्याने त्यांच्यामध्ये ९० टक्के गुणवत्ता प्राप्त केल्याचे दिसून आले आहे. मुले स्वत:हून शिकत आहेत. शिक्षक केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावित आहेत. शाळेत शिकणाऱ्या मुलांवर कोणत्याही प्रकारचे दडपण नाही. ते सहजपणे हसतखेळत आनंददायी वातावरणात शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना मल्लखांब, ज्युडो कराटेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीनुसार विद्यार्थी शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून शिकत असल्याचे सांगितले. बीआरसीचे विषय तज्ज्ञ सुषमा खराबे व राजू नागरे यांनी गडचिरोली जिल्ह्यात बोलीभाषेची अडचण येत असल्याची बाब लक्षात आणून दिली असता, मुल स्वत:हून शिकल्यास ही अडचण कमी होईल, अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी काळे यांनी दिली. या दौऱ्यात देचलीपेठा, अहेरी, देवलमरी, महागाव केंद्रातील शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र मुलकरी आदी सहभागी झाले होते. अहेरी तालुक्यातही ज्ञानरचनावाद पद्धतीनुसार अध्यापन केले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
अहेरीतील शिक्षकांनी जाणले ज्ञानरचनावादाचे तंत्र
By admin | Published: December 26, 2015 1:38 AM