लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता पोलीस आणि आरोग्य यंत्रणेच्या मदतीला चामोर्शी तालुक्यातील माध्यमिक व जिल्हा परिषद शिक्षक कर्तव्य बजावीत असून तालुक्यातील सीमेवर तयार करण्यात आलेल्या चेक पोस्ट नाक्यावर पोलीस यंत्रणेसोबत शिक्षक गेल्या तीन महिन्यापासून आपले कर्तव्य बजावत आहेत.जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या सीमा ओलांडून येणाऱ्या नागरिकांची ओळख पटवण्यासाठी तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील कोणी येऊ नये यासाठी चामोर्शी तालुक्यातील हरणघाट सीमारेषेवर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी होत आहे. या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या लक्षात घेता चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षक, व माध्यमिक शिक्षक आपला राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवित आहेत.
चामोर्शी तालुक्यातील आतापर्यंत अनेक शिक्षक दर आठ तासांची ड्युटी करत आहे. प्रत्येक ठिकाणी पाच शिक्षक नियुक्त केले आहे. त्याप्रमाणे त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत चामोर्शी पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहेत. चेक पोस्ट वर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांचे थर्मल स्क्रीन करण्याकरिता थर्मल स्क्रीनची कमतरता भासत आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांनी थर्मल स्क्रीन, मास्क, सॅनिटायझर व हातमोजे यांची मागणी करीत आहेत.