संजय तिपाले
गडचिरोली : जिल्हा दुर्गम, मागास असला तरी कॉन्व्हेंट संस्कृती बऱ्यापैकी फोफावली आहे. या मुलांशी स्पर्धा करताना आश्रमशाळेतील मुले मागे राहू नयेत, यासाठी यंदा सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय समाजकल्याण विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे सर्व आश्रमशाळांचे रुपडे पालटले असून, विद्यार्थ्यांची बोटे आता टॅबवर खेळणार आहेत. शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना विशिष्ट गणवेश (ड्रेस कोड) लागू केला असून, ओळखपत्रही अनिवार्य आहे.
इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे जिल्ह्यात ११ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. येथे विमुक्त जाती, भटक्या जमाती, ओबीसी, एसबीसी यांचे विद्यार्थ्यांना मोफत निवास आणि शिक्षण दिले जाते. मात्र, आश्रमशाळांमधील तोकड्या सुविधा तसेच कॉन्व्हेंटच्या तुलनेत सुमार दर्जाचे शिक्षण यावरून नेहमीच प्रश्न उपस्थित होतात. परिणामी काही पालक आर्थिक क्षमता नसतानाही आश्रमशाळेऐवजी आपली मुले कॉन्व्हेंटमध्ये पाठविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र होते. नव्याने रूजू झालेले समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी ही बाब हेरली व सर्व आश्रमशाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला.
आश्रमशाळेतील मुलांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्रजीतून शिकवले जाणार आहे. स्वातंत्र्यदिनी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात काही मुलांना टॅब वाटप केले. येत्या आठ दिवसांत सर्व मुलांच्या हाती टॅब दिसतील. मुलांना कॉन्व्हेंटच्या सुविधा मिळाव्यात, यासाठी शाळांमध्ये रंगरंगोटी केली असून, सुशोभिकरण करून गुणवत्तावाढीचाही प्रयत्न आहे.
- डॉ. सचिन मडावी, सहायक आयुक्त समाजकल्याण, गडचिरोली
दर शनिवारी दफ्तरमुक्त शाळा
आश्रमशाळांमध्ये पहिली ते बारावीपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. मात्र, काही विद्यार्थी दहावीनंतर शिक्षण सोडतात. त्यांना शिक्षणाची रुची लागावी व गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी आनंददायी शिक्षण देण्याचा प्रयत्न अहे. याचाच एक भाग म्हणून दर शनिवारी अभ्यासक्रम न शिकवता विद्यार्थ्यांच्या कला, गुणांना वाव देण्यासाठी दफ्तमुक्त शाळा उपक्रम राबविला जाणार आहे. गुणवत्ता वाढीचा आढावा सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी व निरीक्षक राहुल गोविंदलवार हे घेणार आहेत.