गडचिराेली : कुरखेडा तालुक्यातील पाच बुथवर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मतदान उशिरा सुरू झाले. बुथ परिसरात मतदानासाठी नागरिकांची रांग लागली असतानाच काही काही मतदारांना ताटकळत राहावे लागले.
कुरखेडा शहरातील ग्रामीण विकास शाळेतील बूथ क्र. ३५ मधील ईव्हीएम सकाळी ७ वाजता मतदानासाठी सज्ज करण्याचे प्रयत्न सुरू झाले; परंतु मशीन सुरू झाली नाही. मतदानासाठी सकाळपासून आलेल्या मतदारांना रांगेतच ताटकळत राहावे लागले. दरम्यान त्यांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. येथील तांत्रिक बिघाड सकाळी ८:४२ वाजता दूर करण्यात आला. पुन्हा ईव्हीएम सुरू झाल्यानंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. याशिवाय तालुक्यातील चिखली येथील बूथ क्र. २६ मधील ईव्हीएम सकाळी सुरू न झाल्याने गोंधळ निर्माण झाला. मशीनमधील तांत्रिक बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. तब्बल २ तासांनी हा बिघाड दुरूस्त करण्यात आला. यानंतर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. याशिवाय गेवर्धा बूथ क्र. २२ येथे सुद्धा ईव्हीएम सुरू झाली नाही. त्यामुळे येथे दीड तास उशिरा मतदान सुरू झाले. शिरपूर बूथ क्र. ९४ येथील ईव्हीएम सकाळी ८: ०५ वाजता बंद पडल्याने मतदानात खोळंबा निर्माण झाला. येथे ९.२५ वाजता मशीन बदलवत नवीन मशीन लावत पुढील मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. खेडेगाव येथेही मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आल्याने मतदान प्रक्रियेत खाेळंबा निर्माण झाला.