मनोज ताजने ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : नवनिर्मित नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये मंजूर आकृतीबंधातील राज्यस्तरीय संवर्गातील पदे वगळता उर्वरित पदांवर जुन्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात तांत्रिक अर्हतेची अडचण येत आहेत. ती दूर करण्यासाठी ५० वर्षांवरील कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेत पूर्णपणे सूट तर ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षेपर्यंत तांत्रिक अर्हता प्राप्त करण्याची सूट देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्यात तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत असलेल्या प्रत्येक तालुका मुख्यालयांचे नगर पंचायतीत रुपांतर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. याबाबतच्या प्रथम उद्घोषणेपूर्वी रितसर प्रक्रियेने ग्रामपंचायतमध्ये लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नगर पंचायतीत समायोजित करायचे होते. परंतु तांत्रिक अर्हतेमुळे (एमएस-सीआयटी, टंकलेखन) त्यांचे समावेशन होऊ शकले नाही. याबाबत कर्मचारी संघटनांची निवेदने आणि विभागीय स्तरावरून प्राप्त अहवालानुसार तांत्रिक अर्हतेत सूट देण्याचा निर्णय ३० नोव्हेंबर रोजी जारी करण्यात आला.त्यानुसार ५० वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक अर्हतेतून सूट तर ५० पेक्षा कमी वय असणाऱ्यांना समावेशनानंतर ३ वर्षाच्या आत तांत्रिक अर्हतेबाबतचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ते सादर न केल्यास त्यांचे समावेशन रद्द होणार आहे.
चार आठवड्यात समावेशन कराशासन निर्णय १९ जानेवारी २०१७ नुसार विहीत अर्हता पूर्ण करणाऱ्या तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधातील मंजूर पदांवर समावेश करण्याची कार्यवाही विभाग स्तरावर गठित केलेल्या समितीने पूर्ण करणे अपेक्षित होते. पण ती प्रक्रिया पूर्ण झाली नसल्यास येत्या ४ आठवड्यात म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावी, असेही शासन आदेशात नमूद केले आहे.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने समावेशनासाठी शिफारस केलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मुख्याधिकाºयांनी २ आठवड्याच्या आत नियुक्ती आदेश द्यावा, असे नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी सूचित केले आहे.अर्हता धारण करणारा कर्मचारी ज्या पदावर कार्यरत आहे त्या प्रकारचे पद समावेशनासाठी उपलब्ध नसल्यास अन्य ज्येष्ठ अथवा कनिष्ठ स्तरावरील पदावर समावेशन करता येणार आहे. मात्र भविष्यात कोणत्याही पदावर नियुक्तीसाठी मागणी करणार नाही, अशा आशयाचे हमीपत्र कर्मचाºयाने विभागीय आयुक्तांकडे सादर करायचे आहे.