गडचिरोली : जिल्ह्यात एकूण १ हजार ६४५ माजी मालगुजारी तलाव आहेत. यापैकी काही तिमाही, सहामाही व बारमाही पाणी असणारे तलाव आहेत. १ हजार ६४५ तलावांच्या माध्यमातून बारमाही सिंचनाची सुविधा होण्याच्या दृष्टीने जि.प.च्या सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत नियोजन करण्यात आले. पहिल्या वर्षी ३०० तलावांच्या तांत्रिक पध्दतीने पुनर्बांधणीचे काम पूर्ण करण्यात येणार असून सदर तलाव चौफेरी फायदेशीर होण्याच्या दृष्टीने जि.प. च्या माध्यमातून योजना राबविण्यात येणार आहे. शेतीला सिंचन सुविधा निर्माण करण्यासोबतच तलावामध्ये फिशटँकची व्यवस्था करण्याकरीता तांत्रिक पध्दतीने तलावाची पुनर्बांधणी करण्याची योजना जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. यातून मासेमारी व्यवसायाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३० ते ४० कुटुंबांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे. याशिवाय तलावाच्या पाण्याची क्षमता वाढल्यानंतर निस्तार हक्क असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी तांत्रिक पध्दतीने पुनर्बांधणी केलेल्या ३०० तलावांमध्ये मासेमारी व्यवसायासोबतच ओझोला वनस्पतीची लागवड करण्यात येणार आहे. यामुळे तलावातील माशांना खाद्य उपलब्ध होणार आहे. ओझोला ही वनस्पती दुधाळू जनावरांना अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. ओझोला वनस्पती शेतकरीता शेंद्रीय खत म्हणून वापरता येणार आहे. माजी मालगुजारी तलावाच्या पुनर्बांधणीनंतर पाण्याच्या साठ्यात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना पीकाची हमी मिळणार आहे.
तांत्रिक पध्दतीने तलावाची पुनर्बांधणी
By admin | Published: November 22, 2014 11:00 PM